आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: दादा वासवानी : सामाजिक कार्यात अग्रेसर, स्त्री शिक्षणाचा वसा, शाकाहाराचे पुरस्कर्ते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- साधू वासवानी मिशनचे प्रमुख, ख्यातनाम आध्यात्मिक गुरू अाणि सिंधी समाजाचे धार्मिक गुरू दादा जशन वासवानी (वय ९९) यांनी गुरुवारी सकाळी नऊ वाजता अखेरचा श्वास घेतला. वयाेमानानुसार शरीर साथ देत नसल्याचे त्यांना तीन अाठवड्यांपूर्वी रुबी हाॅल रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. मात्र, प्रकृती उपचारांना साथ देत नसल्याने बुधवारी सायंकाळीच त्यांना रुग्णालयातून साधू वासवानी मिशन येथे अाणण्यात अाले हाेते. मात्र, गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्याेत मालवली. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत. दरम्यान, दादांच्या पश्चात मिशनचे प्रमुख रत्ना वासवानी व चेअरमन कृष्णा कुमारी मिशनची धुरा सांभाळतील. 


जन्म सिंध प्रांतातील
दादा वासवानी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात हैदराबाद येथे २  अाॅगस्ट १९१८ राेजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पहिलाजराय, तर अार्इचे नाव कृष्णादेवी हाेते. त्यांचे वडील पहिलाजराय हे हैदराबाद ट्रेनिंग काॅलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत हाेते. तर, साधू वासवानी त्या वेळी पतियाळा येथील महिंद्रा काॅलेजमध्ये प्राध्यापक हाेते. दादांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथील टी. सी. प्रायमरी स्कूलमध्ये झाले. सुरुवातीपासूनच त्यांच्या अायुष्यावर काका साधू वासवानी यांच्या जीवनाचा प्रभाव पडला.  ‘स्कॅटरी अाॅफ एक्स-रेज बाय साॅलिड’ या विषयावर दादांनी प्रबंध लिहिला हाेता. नाेबेल विजेते सर व्ही. व्ही. रमण यांनी सदर प्रबंधाची प्रशंसा केली हाेती. दादांचे इंग्रजी व सिंधी भाषेवर विशेष प्रभुत्व हाेते. साेप्या व सुटसुटीत भाषेत अाणि खणखणीत अावाजात ते प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत. दादांची राहणी साधी असे. अंगात पांढरा शर्ट, पायजमा, त्यावर अाेढलेली पांढरी शाल, साधी चप्पल, चमकदार डाेळे, तेजस्वी चेहरा, चमकणारी नजर, ऊर्जा, तीक्ष्ण विनाेदबुद्धी ही त्यांची वैशिष्ट्ये हाेत. ‘तुम्हाला अानंदानं जगायचं असेल तर इतरांना अानंदी करा’, ‘अाजची तातडीची गरज काय, तर समजून घेणाऱ्या बुद्धीपेक्षाही समजून घेणारं हृदय’ असे त्यांचं अाग्रहाचे सांगणे हाेते. 


जीवन परिचय  
१९३२ मध्ये दादा मॅट्रीकची परीक्षा पास झाले. त्यानंतर १९३६ मध्ये बी. एस्सी. पास झाल्यानंतर डी.जे.सिंध महाविद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. १९३७ ला दादांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले. मात्र, १९३९ मध्ये त्यांनी घर सोडले आणि काका साधू वासवानी यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजकार्यात वाहून घेतले. १९४० मध्ये ते एम. एस्सी. झाले. वासवानी मिशनची स्थापना त्यांचे गुरू साधू टी एल वासवानी यांनी केली. नाेव्हेंबर १९४८  मध्ये दादा हे साधू वासवानींसोबत भारतात आले. १९६२ ते १९७६ दरम्यान ते सेंट मिराज काॅलेज अाॅफ गर्ल्सचे प्राचार्य हाेते. १९६६ मध्ये काका साधू वासवानी यांच्या निधनानंतर सर्व संस्थांची जबाबदारी दादांवर अाली. १६ मार्च १९८४ ला पुण्यात साधू वासवानी आश्रमाची स्थापना केली. गुरूंचे प्रिय शिष्य दादा जशन वासवानी सध्या मिशनची धुरा सांभाळत होते. या मिशनचे पुण्यात मुख्यालय असून, देश व जगभरात केंद्रे आहेत.  


आध्यात्मिकतेवर जगभर व्याख्याने, मार्गदर्शन
काका साधू वासवानी यांच्या पश्चात दादांनी जगभरात मिशनचे काम वाढवले. सर्व धर्मग्रंथांचे अध्यायन केले.  शिकागो, कयाेटा, जपान, युनाेच्या सभागृहात त्यांनी आध्यात्मिकतेवर भाषणे दिली, तर इंग्लंडच्या हाऊस अाॅफ काॅमनमधील भाषणाने सर्वांना प्रभावित केले. इंग्रजी व सिंधी भाषेत त्यांनी अनेक विषयांवर त्यांनी सुमारे १५०० प्रेरणात्मक पुस्तके लिहिली अाहेत. त्यांचा ‘अंजली’ हा काव्यग्रंथ फारच मार्मिक, बाेधक अाहे. त्यांच्या प्रकाशित ८८ पुस्तकांचा जगातील १७ भाषांत अनुवाद करण्यात अाला अाहे. दादा वासवानी यांना अांतरराष्ट्रीय पुस्काराने सन्मानित करण्यात अाले अाहे. यामध्ये पाॅल हॅरिस फेलाेशिप, द ह्युमेटरिन अाॅफ इयर अवॉर्ड, यूएसएचा पीस पिलग्रिम पुरस्कार, जीवन गाैरव प्राणिमित्र पुरस्कार, संत ज्ञानेश्वर विश्वशांती पुरस्कार, प्रियदर्शिनी पुरस्कार, शांतिदूत पुरस्कार यांनी त्यांना पुरस्कृत करण्यात अाले अाहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन २०१४ मध्ये त्यांना ‘डी लिट’ पदवीने सन्मानित करण्यात अाले हाेते.  


शतक महाेत्सवी कार्यक्रम अधुराच  
दादा वासवानी यांच्या शतक महाेत्सवी वर्षानिमित्त मिशनतर्फे ३१ जुलै ते दाेन अाॅगस्टदरम्यान कार्यक्रमांची अाखणी करण्यात येत हाेती. मिशनच्या कार्यालयात माेठा मांडव घालून दरराेज सत्संगाचे नियाेजन अंतिम टप्प्यात अाले हाेते. तसेच दादांनी गुरूंचा संदेश जनमानसात पाेहोचवण्याचे कार्य केल्याने त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास या माध्यमातून उलगडला जाणार हाेता. २अाॅगस्ट दादांचा जन्मदिवस असल्याने मिशनने सदर दिवस ‘क्षमा दिवस’ म्हणून जाहीर केला हाेता. मात्र,  या साेहळ्याचे स्वप्न अधुरेच राहिले.


अाज अंत्यविधी, अडवाणी येणार  
मिशनचे प्रवक्ते नरेश सिंघानी यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी दाेन वाजता रथातून पाच ते सहा किलाेमीटर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार अाहे.   दरवर्षी २३ नाेव्हेंबर राेजी मिशनच्या प्रचाराकरिता रथयात्रा काढण्यात येते, त्याच मार्गावर  रथातून दादांची अंत्ययात्रा काढण्यात येर्इल. सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर साधू वासवानी यांच्या समाधीशेजारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यसंस्काराकरिता माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार अाहेत. 


सदिच्छादूत हरपला  
दादा वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुरस्कार करणारा एक श्रेष्ठ सदिच्छादूत हरपला. दादांशी माझा निकटचा ऋणानुबंध हाेता. त्यांच्या विचारांनी मी प्रभावित झालाे. शिकागाे येथील जागतिक धर्म संसद व न्यूयाॅर्क येथील जागतिक शांतता परिषदेत त्यांनी केलेले संबाेधन भारतीय तत्त्वज्ञानाची महत्ता दर्शवणारे हाेते. देशाने एक थाेर सुपुत्र गमावला अाहे.  
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री   


शिक्षणासाेबत अाराेग्य सेवेचे भरीव काम
साधू वासवानी मिशनतर्फे अनेक सामाजिक कामे दादांनी उभारली. स्त्री शिक्षणाला प्राधान्य देण्याकरिता सेंट मीरा स्कूल व काॅलेज हे फक्त मुलींकरिता सुरू केले. एक शिक्षित स्त्री संपूर्ण समाजाची दिशा बदलू शकते असे त्यांचे मत हाेते. मिशनच्या माध्यमातून देशभरात १५ शाळांत सुमारे १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत. ३० मे राेजी पुण्यात वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद‌्घाटन राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या उपस्थितीत करण्यात अाले हाेते. त्या वेळी दादा वासवानी यांनी नवीन शिक्षण पद्धतीमुळे मानवतेचा विकास हाेण्यास मदत हाेत असल्याचे सांगत अखेरचे भाषण केले. त्यांच्या सत्संगामध्ये सर्वधर्मांप्रती अास्था व अादर असे. सेवा हाच खरा मानव धर्म हीच त्यांची मुख्य संकल्पना असे. सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, अज्ञान याच्याविराेधात त्यांनी काम केले. शाकाहाराचा प्रचार ते करत असत अाणि पशुहत्या निषिद्ध मानून प्राणिहत्या थांबवण्याचे अावाहन ते वेळाेवेळी करत हाेते. १९८६ पासून त्यांनी २५ नाेव्हेंबर हा ‘मांसाहार सेवन बंद दिवस’ पाळण्यास सुरू केली. हा दिवस जगभरात ‘अांतरराष्ट्रीय मांसरहित दिवस’ म्हणून पाळला जाताे अाहे. मिशनच्या माध्यमातून त्यांनी हृदयराेग, डाेळे, कॅन्सर तसेच मुलांसाठी अाधुनिक रुग्णालय व तपासणी संस्थेची उभारणी केली. ९१ हजार रुग्णांची माेफत डाेळ्यांची शस्त्रक्रिया, तर ७२०० जणांना कृत्रिम अवयवांचे वाटप मिशनतर्फे केले. तर १३ हजार १५७ जणांची माेफत हदय शस्त्रक्रिया करण्यात अाली.

 

बातम्या आणखी आहेत...