आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: अभियांत्रिकी प्रश्नपत्रिकेचे फोटो माेबाइलने केंद्राबाहेर पाठवणारा विद्यार्थी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात गेल्या बुधवारी परीक्षेच्यावेळी वर्गात मोबाइल नेऊन प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते बाहेर पाठवणाऱ्या विद्यार्थ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पथकाने शनिवारी पकडले. हा खोडसाळपणा करणाऱ्या आदर्श रवींद्रन नामक या विद्यार्थ्याविरुद्ध महाविद्यालयातर्फे पोलिसांत तक्रार दिली जाईल.


सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयाच्या हलगर्जीपणाबद्दल कारवाई   करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली. आदर्श रवींद्रन हा अभियांत्रिकी शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. पहिल्या वर्षाच्या ‘इंजिनिअरिंग मेकॅनिक्स’ या विषयात अनुत्तीर्ण झाल्याने गेल्या बुधवारी त्याने ‘बॅकलॉग’चा पेपर दिला. त्या वेळी त्याने हा खोडसाळपणा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.  


संशयित विद्यार्थी मूळ केरळचा
आदर्श हा मूळचा केरळचा असून त्याचे वडील लोणावळ्यात राहतात. तो पुण्यात भाड्याने खोली घेऊन राहतो. प्राप्त माहितीनुसार, आदर्श पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्रावर १५ मिनिटे उशिरा पोहोचला. वर्गातील शिक्षकांची नजर चुकवून त्याने मोबाइल सोबत नेला. हा फोन त्याच्या मित्राचा होता. आत जाताच त्याने तातडीने प्रश्नपत्रिका घेतली आणि मोबाइल फोनवरून त्याची छायाचित्रे घेतली. ही छायाचित्रे वर्गाबाहेर पाठवून त्याने फोन पुन्हा बॅगेत ठेवून दिला.  त्याने गुन्हा कबूल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...