आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - ‘जातीयवादी पक्षांचा पराभव करण्याची भूमिका आम्ही दोघे (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) मांडत असतो. मित्रपक्षाने याकडे गांभीर्याने पाहिले तर आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ, पण रडीचा डाव खेळू नका,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता काँग्रेसला फटकारले. समंजसपणाने मार्ग काढण्याची आमची तयारी असली तरी आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवू. दुसरा पर्याय नाही, असेही त्यांनी सुनावले.
नूतन कार्यकारिणी निवडीसाठी बोलावलेल्या पक्षाच्या सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते. या वेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात अाली.तर जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. या वेळी राष्ट्रीय महासचिव डी. पी. त्रिपाठी, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे आमदार-खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाचे दिल्लीत वजन वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून दहापेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवले आहे. याचाच भाग म्हणून प्रदेशाध्यक्षपदाचा खांदेपालट करण्याबरोबरच संभाव्य जागावाटपात काँग्रेसवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेससोबत आघाडी झाल्यास जागावाटपात राज्यात लाेकसभेच्या २० पेक्षा जास्त जागा लढवण्याची राष्ट्रवादीची तयारी अाहे.
सन २०१९ मध्ये त्रिशंकू चित्र झाल्यास भाजपेतर पक्षांची आघाडी बांधून सत्ता स्थापनेचा पर्याय पुढे येईल. सपा, बसपा, तृणमूल, बिजू जनता दल, द्रमुक, अद्रमुक, तेलुगू देसम या प्रादेशिक पक्षांइतके खासदार निवडून आणणे ‘राष्ट्रवादी’ला शक्य नाही. परंतु आघाडीचा सर्वसहमतीचा नेता निवडण्याची वेळ आल्यास चमत्कार घडू शकतो, असा ‘राष्ट्रवादी’चा होरा आहे. या दृष्टीने ‘राष्ट्रवादी’ने लोकसभेतले बळ वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सुनील तटकरे यांना रायगडमध्ये ताकद लावता यावी म्हणून प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे केले.
याच वेळी पश्चिम महाराष्ट्रातल्या जयंत पाटील यांच्याकडे या पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. हा निर्णय पूर्णतः पवार यांचा एकट्याचा होता. धनंजय मुंडे यांचे पक्षातले नवखेपण आणि आधीच त्यांच्याकडे असणारे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद या पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यास पक्षात नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे मुंडे यांचे नाव शर्यतीतच नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.
ग्रामीण अर्थव्यवस्था- कृषी- सहकार, शहरी प्रश्नांबद्दलची सखोल जाण व ‘मराठा कार्ड’ यामुळे पाटील यांची निवड सोपी झाली. आमच्याकडे निर्णय चटकन होतात. बैठकीत प्रफुल्ल पटेल सांगतात, ‘आपण असे करुयात.’ काय करायचे हे पवारांनी आधीच त्यांना सांगितलेले असते. त्यामुळे पटेलांच्या म्हणण्याला कोणी विरोध करण्याचा प्रश्न आला नाही. पाटील यांची निवड बिनविरोध झाली अशी माहिती ‘राष्ट्रवादी’च्या ज्येष्ठ नेत्याने दिली.
काँग्रेसने मैत्रीधर्म निभावला नाही
काँग्रेसने मैत्रीधर्म निभावला नसल्याची अनेक उदाहरणे सांगून पवारांनी काँग्रेसचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘साताऱ्याची जागा कोणाची होती? विधान परिषदेची ती जागा (काँग्रेसने) आमच्याकडून हिसकावून घेतली. यवतमाळ, सोलापूरच्या जागा ‘राष्ट्रवादी’च्या असताना जातीयवाद्यांशी जवळीक साधणाऱ्यांना कोणी मदत केली याचे उत्तर (काँग्रेसला) द्यावे लागेल. उलट आमची भूमिका स्पष्ट आहे. निपाणीला काँग्रेसला मतदान करण्याची भूमिका सभेत मांडली. कर्नाटकात आम्ही काँग्रेसला मदत करतो आहोत,’ असे पवारांनी सांगितले.
उस्मानाबाद, लातूर, बीड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
मित्रपक्षांशी बोलून समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून पवार म्हणाले, ‘लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जागा आपल्याकडे नाहीत. पण त्यासाठी आपण आग्रही राहू. कारण या जागा आपल्या होत्या. यासंदर्भात वृत्तपत्रांतून माझ्या वाचनात आले. मित्रपक्षांच्या वतीने सांगण्यात आले की, ‘तुमचा अधिकार काय? तुम्ही या जागा कशा मागता?’ यावर पवारांनी काँग्रेसला सुनावले, की ज्यांचा व्यवहार ठीक असेल त्यांनीच हे बोलावे.
काँग्रेसने समंजसपणे योग्य मार्ग काढावा
पवारांनी परभणी, नाशिक, रायगड या जागांचा उल्लेख करत आम्ही जिंकलेल्या जागा आम्हीच लढवू, याला पर्याय नाही, असे सांगितले. पोटनिवडणुका जाहीर झाल्या. आमचा समन्वयाचा प्रयत्न आहे. एखादी लोकसभा त्यांनी (काँग्रेस) लढवावी, एखादी आम्ही लढवू. यूपीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला, ही साधीसुधी गोष्ट नाही. हे लक्षात घेता काँग्रेसने समंजसपणाने मार्ग काढावा, असे ते म्हणाले.
देशात अस्वस्थता, मोदींवर हल्ला
‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही ७१ हजार कोटी दिले. नीरव मोदीसारख्या कर्जबुडव्यांमुळे अडचणीत आलेल्या बँकांना या सरकारने ८७ हजार कोटी दिले. हा धोरणातला फरक आहे,’ अशी टीका पवारांनी मोदी सरकारवर केली. “देशात आज अस्वस्थता आहे. सत्ताधाऱ्यांची बांधिलकी दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक या वर्गाशी किती याची शंका आहे,’ असे शरद पवार म्हणाले.
जातीधर्माचा विचार करून टीम निवडा : अजित पवार
‘जातीधर्माचा विचार करून नवीन टीम तयार करावी. आपला समाज वंचित राहिला, असे कुठल्याही घटकाला वाटू नये.’ असा सल्ला अजित पवारांनी जयंत पाटील यांना दिला. ‘महिला, दलित, ओबीसी, आदिवासींना पदाधिकारी निवडीत प्रकर्षाने संधी द्या,’ असे शरद पवार यांनीही पाटील यांना सांगितले.
हेही वाचा,
- लाेकसभेला ‘टेन प्लस’ जागांसाठी ‘राष्ट्रवादी’च्या राज्य नेतृत्वात बदल
- प्रसंगी वाईटपणाही घेऊ, पण नेत्यांच्या कामाचेही मूल्यमापन करणार : जयंत पाटील
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.