आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे वेधशाळेच्‍या हवामान विभागाला टाळे, आता दिल्‍लीहून मिळणार अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 1928पासून राज्‍याच्‍या हवामानाचा अंदाज सांगणारे पुणे वेधशाळेचे हवामान अंदाज विभाग बंद करण्‍याचा निर्णय भारतीय हवामानशास्‍त्र विभागाने (आएमडी) घेतला आहे. यापुढे देशातील सर्व स्थानिक विभागांच्‍या हवामानाची दिल्लीवरून देण्‍यात येणार आहे. स्थानिक हवामान केंद्रांद्वारे ही माहिती नंतर त्‍या त्‍या राज्‍यातील नागरिकांना दिली जाणार आहे. महाराष्‍ट्राचा हवामानाचा अंदाज मुंबई केंद्रातर्फे सांगितला जाणार आहे.

 

स्‍थानिक अंदाजावर परिणाम होण्‍याची शक्‍यता

आयएमडीच्‍य सुत्रांनूसार, दिल्‍लीतून देशभरातील हवामानाचे अंदाज सांगण्‍याची प्रक्रिया नोव्‍हेंबरमध्‍ये पार पडली होती. पुणे वेधशाळेचे उपमहासंचालक हे पदही बाद करण्‍याचा निर्णय घेतल्‍याची माहिती आहे. सध्‍या पुणे वेधशाळेचे संचालकपदही रिक्‍त आहे. या निर्णयाबाबत हवामान तज्ञांनी मात्र खेद व्‍यक्‍त केला आहे. स्‍थानिक हवामान अंदाजावर याचा परिणाम होईल, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. मात्र उघडपणे याविषयी कोणीही मत मांडण्‍यास तयार नसल्‍याचे दिसत आहे.

 

खासगी कंपन्‍या फायदा उठवतील- माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर

एका माध्‍यम संस्थेशी बोलताना पुणे वेधशाळेचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी या निर्णयामुळे हवामान अंदाजाचे कौशल्‍य लोप पावेल, अशी खंत व्‍यक्‍त केली आहे. विदेशी मॉडेल आणि सुपर कम्प्युटरचा वापर करून दिल्लीतून संपूर्ण देशाचा अंदाज सांगण्‍याची ही प्रक्रिया आहे. हे असेच सुरू राहिले तर भविष्यात 'आयएमडी'चीही गरज उरणार नाही. ज्या अमेरिका आणि युरोपची मॉडेल वापरून आपण हवामान अंदाज देतो, उद्या तेथील कंपन्या थेट भारतातील स्थानिक अंदाज देऊ लागतील. देशाच्या सर्व भागांत हवामान अंदाजाचे कौशल्य असणारे शास्त्रज्ञ निर्माण करण्याऐवजी ते अंदाज दिल्लीत एका ठिकाणी केंद्रित करण्याच्या निर्णयाचा लाभ खासगी कंपन्या उठवतील.', अशी भीती त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.  

 

1928 पासून पुणे वेधशाळेच्‍या कामास सुरूवात

हवामानाचा अंदाज वर्तवणा-या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कार्यालय शिमला येथून 1928 साली पुण्याला स्थलांतर झाले. 1 एप्रिल 1928 रोजी पुणे वेधशाळेतून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. दुस-या महायुद्धानंतर ते दिल्‍लीला हलवण्‍यात आले होते. त्‍यानंतरही स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील हवामान अंदाजाची जबाबदारी पुण्यातील केंद्राकडेच होती. त्यासाठी उपमहासंचालक (हवामान अंदाज) आणि पुणे वेधशाळा संचालक अशा दोन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पुणे वेधशाळेचे काम सुरू होते. आता ही दोन्ही पदे बाद करण्यात आली असून, पुण्यातील केंद्राकडे देशभरातील हवामानाच्या नोंदी दिल्ली आणि मुंबई केंद्राकडे पाठवण्याचे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 

बातम्या आणखी आहेत...