आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजितदादांना शिंगावर घेण्याचा हर्षवर्धन पाटलांनी केला इरादा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - इंदापूरवरून काँग्रेसबरोबरची आघाडी तुटेल, असा टोकाचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना शिंगावर घेण्याचा इरादा काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. इंदापूर (जि. पुणे) येथील ‘राष्ट्रवादी’ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गावातल्या जाहीर कार्यक्रमाला येत्या रविवारी उपस्थित राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  


१९९५ ते २०१४ या कालावधीत इंदापुरातून सलग निवडून येणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा २०१४ मध्ये ‘राष्ट्रवादी’ने पराभव केला होता. अजित पवारांनी इंदापूरची जागा प्रतिष्ठेची करत पाटील यांच्या पराभवासाठी ताकद लावली होती. २०१९ ची निवडणूक जवळ येत असताना पाटील आणि पवार यांच्यातील संघर्षाला पुन्हा तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदारांच्या गावात जाऊनच रणशिंग फुंकण्याची तयारी पाटील यांनी केली आहे.

 

“काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली तरी बेहत्तर, पण इंदापूरची जागा काँग्रेसला देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा अजितदादांनी इंदापूर तालुक्यातल्या सभेत जाहीरपणे घेतला. “१९५२ पासून इंदापूरची जागा काँग्रेसकडे आहे. २०१९ मध्ये इंदापुरातून मीच काँग्रेसचा उमेदवार असेन. पवारांच्या दाव्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही,” असे जोरदार प्रत्युत्तर पाटील यांनी त्यावर दिले होते. 

 

शरद पवारांची नरमाई  
अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात छत्तीसचा आकडा असला तरी शरद पवार यांची भूमिका नेहमी नरमाईची राहिली आहे. सुप्रिया सुळेंचा बारामती लोकसभा मतदारसंघ हे त्याचे कारण आहे. पाटील यांचा इंदापूर आणि आमदार संग्राम थोपटे यांचा भोर हे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येतात. सन २००९ आणि २०१४ च्या दोन्ही निवडणुकांत शरद पवार यांनी पाटील आणि थोपटेंचे सहकार्य मिळवले होते. तरीही २०१४ ला अजित पवारांनी पराभव घडवून आणल्याचा सल पाटील यांना आहे.

बातम्या आणखी आहेत...