आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड: सांगवी परिसरात पोलिस गस्त घालताहेत सायकलवरून, फिटनेसवर उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- वाहतूक पोलिस म्हटलं की हमखास त्यांच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. लायसन्स नाही, हेल्मेट नाही किंवा पीयूसी नाही अशा विविध प्रकारे हे वाहतूक पोलिस छळत असल्याचे नागरिकांना वाटते. परंतु, ते त्यांचं कर्तव्य बजावत असतात. बऱ्याच वेळेस वाहनचालक हे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत असतात, यातून भ्रष्टाचाराचा आणि नियम पाळत नसल्याचा विषय काढला जातो. परंतु वाहतूक पोलिसांविषयी पाच ही बोटे सारखी नसतात अस म्हणावं लागेल. त्यामुळेच सांगवी वाहतूक पोलिसांनी चक्क सायकलवरून गस्त घालत या विषयांना पूर्ण विराम दिला आहे. एक वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, नवी सांगवी, काळेवाडी या परिसरात वाहतूक कोंडी जास्त आहे. अनेक वेळेस विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना थांबवणं अवघड जातं, परंतु वाहतूक पोलीस सायकलवरून गस्त घालत असल्यापासून याला आळा बसला असल्याचं वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले आहे. हा उपक्रम नवीन वर्षापासून सुरू केला आहे. महाराष्ट्रात हा पाहिलाच प्रयोग आहे. काही सामाजिक संस्थांनी सांगवी येथील वाहतूक पोलिसांना आत्तापर्यंत ३० सायकल दिल्या आहेत. तर येणाऱ्या काही दिवसात आणखी २२ सायकलची भर पडणार आहे. वाहतूक पोलिसांना सायकलवर पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं, दोन पाऊल पण चालत न जाणारे पोलीस आता १३ किलोमीटर पर्यंत गस्त घालत आहेत. सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत वाहतूक पोलीस सायकल वरून गस्त घालतात. यामुळे त्यांचा व्यायाम होतो आणि फिट राहण्यास मदत होते. चारचाकी आणि दुचाकीवर गस्त घालत असताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे सायकल हा पर्याय चांगला आहे. सायकल वापरल्याने वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर आळा बसतो. गस्त घालत असताना दोन अधिकारी आणि दहा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.

 

नो पार्कींग, फुटपाथ पार्किंग, सायकल ट्रक पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे याच्यावर सध्या सायकल वापराने परिणाम झाला आहे. आत्तापर्यंत ३२ वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना सायकलवर पाहून नागरिक स्वतः सायकल वापरत आहेत. नवनाथ चौधरी हे वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत. त्यांचा काही वर्षापूर्वी अपघातात पाय मोडला होता. ते सध्या लंगडत चालतात परंतु कर्तव्य बजावत असताना ते सायकल चालवतात त्यामुळे त्यांचं या परिसरात कौतुक होत आहे. तर पूजा झावरे या देखील वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत त्या गरोदर असताना देखील कर्तव्य बजावत आवडीने सायकल चालवत आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून वाहतूक पोलिसांच्या फिटनेसवर नामी उपाय निघाला आहे हे मात्र नक्की.

बातम्या आणखी आहेत...