आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येत दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गिरीश बडोले याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी पुण्यात भेट घेतली. यावेळी उस्मानाबादमधील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, भास्कर जाधव आदी नेते उपस्थित होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. यात विविध पदांसाठी 990 नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये राज्यातील शंभरहून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील दहा उमेदवारांनी स्थान मिळविले, त्यात उस्मानाबादमधील गिरीश बडोले राज्यात पहिला तर देशात विसावा आला. गिरीशच्या कुटुंबाचा केवळ दोन एकर शेतीवर चरितार्थ चालतो, त्यामुळे पोराने आई- वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गिरीश बडोलेचे वडील शेतमजूर आहेत. त्यांची दोन एकर शेतजमीन आहे. गिरीशचा एक भाऊ मेकॅनिकल इंजीनियर आहे. गिरीशचं दुसरीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण कसगीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर तिसरी आणि चौथीत तो कासार शिरसी येथील कारीबसवेश्वर विद्यालयात होता. त्याने तुळजापूर येथील सैनिकी विद्यालय माध्यमिक शिक्षण घेतलं. दयानंद विद्यालय लातूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईतील जे. जे. मेडिकल कॉलेजमधून त्याने एम. बी. बी. एस. पदवी घेतली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून सैनिक शाळेसाठी गिरीशची निवड झाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.