आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौंड-बारामतीदरम्यान आज धावणार महिला विशेष रेल्वे; सर्वच महिला कर्मचारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वेचालक महिला, गार्ड महिला, गाडीला झेंडा दाखवणाऱ्या महिला, स्थानक व्यवस्थापक महिला, तिकीट तपासनीस महिला... एवढेच नव्हे तर गाडीच्या टाकीत इंधन भरणारीदेखील महिलाच.  गुरुवारी पहिल्यांदाच रेल्वे धावण्यासाठी सर्व विभागांतील महिला एकत्र येत आहेत. निमित्त आहे जागतिक महिला दिनाचे. सर्व विभागांतील महिला एकत्र येऊन रेल्वे चालवण्याची ही केवळ सोलापूर विभागातील पहिलीच रेल्वे अाहे.


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता शिवाजी कदम यांच्या पुढाकाराने गुरुवारी सकाळी पुणे-बारामती पॅसेंजर ही गाडी दौंड ते बारामती दरम्यान महिला विशेष रेल्वे म्हणून धावणार आहे.  सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी दौंड स्थानकावर बारामती पॅसेंजरचे आगमन होईल. यानंतर सर्व महिला कर्मचारी आपापली कामे पार पाडतील. अनिता राज व अभिलाषा प्रजापती या रेल्वेचालक असतील, तर रजनी येमूल या टाकीत इंधन भरतील. विभावरी मेहरा या गाडीचे इंजिन चेक करून काही तांत्रिक दोष अाढळल्यास त्या दूर करणार आहेत. गाडीची रोलिंग इन आणि आऊट या माधुरी कांबळे, मीना जंगम, संगीता बाबू, लक्ष्मी रामचंदानी, जयश्री हाजी या करतील. गाडीला इंजिन जोडणे व सिग्नल देणे याची जबाबदारी हर्षा अमृते यांची असेल. रेल्वेची संपूर्ण जबाबदारी गार्डवर असते. वैशाली भोसले या गार्ड म्हणून काम करतील. तर स्थानक व्यवस्थापक म्हणून तनुजा डाके या गाडीला हिरवा सिग्नल देणार आहेत. डब्यातील प्रवाशांची तिकीट तपासणी करणारे पर्यवेक्षकदेखील महिलाच असतील. यात शमशाद शेख, ए. ए. बसंगार, एस. पी. गडदे  यांच्यासह वेगवेगळ्या विभागांतील महिला एकत्र येऊन दौंड-बारामती-दौंड पॅसेंजरवर काम करणार आहेत.   

 

साेलापुरात पहिलाच प्रयाेग  

रेल्वेत महिलांचे योगदानदेखील महत्त्वाचे आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व विभागांतील महिला कर्मचाऱ्यांना एकत्र आणून विशेष रेल्वे धावणार आहे. ही सोलापूर विभागात धावणार असल्याने नक्कीच सोलापूरसाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच असा प्रयोग होत आहे.  
- शिवाजी कदम, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...