आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःची साेय स्वत:च करा, पक्षाकडून काहीही मिळणार नाही : अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -‘पक्षाच्या वर्धापन दिनाला येताना स्वतःची सोय स्वतः करा. पक्षाकडून कोणाला काही मिळणार नाही,’ असा सल्ला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी मंगळवारी स्वपक्षातील नेते-कार्यकर्त्यांना दिला आहे.  


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम येत्या १० जूनला पुण्यात होणार आहे. त्याच्या नियोजनाची आढावा बैठक पवार यांनी पुण्यात घेतली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासमोर पवार यांनी हा सल्ला दिला.  
केंद्रात, राज्यात, एवढेच काय पण पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नाही. हेही कमी की काय म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार-खासदारसुद्धा नाही. त्यामुळे वर्धापन दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला साधनांची कमतरता पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या अगतिकतेमधूनच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्वतःची सोय स्वतः करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.   


राज्यातील आणि पुणे-पिंपरी चिंचवडची सत्ता हाताशी असताना २०१४ पूर्वी येथे पक्षाचे अनेक कार्यक्रम थाटात पार पडले आहेत. या कार्यक्रमांसाठी राज्यातून येणाऱ्या नेत्यांची सोय करण्यासाठी दोन्ही पालिकांमधील स्थायी समित्या, नगरसेवक-आमदारांची फौज पक्षाच्या हाती होती. त्या वेळी सरकारी निवासस्थाने, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तारांकित हॉटेलांमध्ये महत्त्वाचे कार्यकर्ते, नेत्यांची साग्रसंगीत सोय केली जात असे. आता या खर्चावर मर्यादा आल्या आहेत.  

 

येडियुरप्पांची खिल्ली  
सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी म्हणून महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी काम पाहिले. कर्नाटकात भाजपच्या येडियुरप्पा यांनी सर्वात कमी दिवसांचा मुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड तोडून टाकला, असे अजित पवार म्हणाले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले नसते तर कर्नाटकातील चित्र वेगळे राहिले असते. एकही आमदार फोडू न शकल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना झापल्याचे त्यांनी सांगितले.

 

सत्ता नसल्याने ‘आर्थिक’ गणित बिघडले  
‘जेवण्याची सोय पक्षाने करावी, असे वाटते. मग निवडणुकीचे तिकीट किंवा पद मागताना जेव्हा येता तेव्हा शक्तिप्रदर्शनासाठी, कार्यकर्त्यांच्या चार-पाच गाड्या घेऊन येता, ते सगळे कुठून येते,’ असा प्रश्नच अजित पवार यांनी केला.  या महत्त्वाच्या कामात सगळ्यांनी मदत करा, असे आवाहनही त्यांनी केले. सत्ता नसल्याने पक्षाची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे पवारांवर ही वेळ आल्याचे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठी सभा घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...