आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचेही संपर्क अभियान : भावी अधिकाऱ्यांशी संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- '२४ तास राजकारणी' अशी ओळख असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रांतील जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला अाहे. केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे नेते, मंत्र्यांनी देशभरात संपर्क अभियानाची टूम काढलेली असतानाच पवारांनीही त्यांच्या पद्धतीने निरनिराळ्या क्षेत्रांतील समाज घटकांशी संवाद प्रस्थापित करण्याचा सपाटा लावला आहे. 


पवारांच्या या भूमिकेचे प्रत्यंतर मंगळवारी पुन्हा एकदा पुण्यात आले. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत लवकरच रुजू होणाऱ्या १४२ विद्यार्थ्यांचा सत्कार करून पवारांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. अनेक विद्यार्थ्यांचे पालक या वेळी उपस्थित होते. 'क्लास वन', 'क्लास टू' प्रवर्गाताले हे अधिकारी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील आहेत. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात पवारांनी पुण्यातच अरुण साधू लिखित कादंबरीवर आधारित 'झिपऱ्या' या चित्रपटाच्या खास 'शो'ला उपस्थिती लावली होती. 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक पाहण्यासाठीही पवार सपत्नीक गेले होते. या दोन्ही ठिकाणी पवारांनी संबंधित चित्रपट व नाटकातील पडद्यावरचे कलाकार व पडद्यामागचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, निर्माते आदींशी संवाद साधला होता. रतन टाटा, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर आदी ठरावीक 'सेलिब्रिटीज'ना भाजप नेते भेटत असताना पवारांचा भर मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यावर असल्याचे दिसून येते. 


उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, विक्रीकर अधिकारी आदी महत्त्वाच्या पदांवर काम सुरू करणारे १४२ तरुण अधिकारी पवारांच्या भेटीमुळे भारावून गेल्याचे दिसून आले. पवारांकडून सत्कार होणे, त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला मिळणे हा आनंदाचा क्षण असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. पवारांनीही या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दरम्यान, प्रशासकीय सेवा परीक्षांच्या मार्गरदर्शनासाठी शरद पवारांनी माजी सनदी अधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, माजी सचिव प्रभाकर देशमुख, माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, माजी कृषी आयुक्त विकास देशमुख, माजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह अनेक अधिकारी पवारांशी जोडले गेले आहेत. "येत्या वर्षभरात विदर्भ- मराठवाड्यात सुरू होणाऱ्या केंद्रांसाठी त्या भागातल्या माजी सनदी अधिकाऱ्यांची टीम गोळा करावी', अशी सूचना पवारांनी या वेळी कोकाटे यांना केली. 


शरद पवार हे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष आहेत. या परिषदेच्या वतीने गेल्यावर्षी पुण्यात 'शाहू अकादमी' सुरू करण्यात आली. याद्वारे प्रशासकीय सेवांच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. पहिल्याच वर्षी या अकादमीत ३२० विद्यार्थी हाेते, पैकी १४२ विद्यार्थी यशस्वी झाले. यातले ५५ खुल्या प्रवर्गातले, १३ एसटी, १६ एससी, २६ ओबीसी आहेत. शाहू अकादमीसारख्या आणखी मार्गदर्शन संस्था येत्या वर्षात नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, वाशिम, गडचिरोली, अमरावती, नवी मुंबईत सुरू करणार आहे. यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेचे हर्षवर्धन देशमुख (विदर्भ), महात्मा गांधी मिशनचे कमलकिशोर कदम, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सतीश चव्हाण (मराठवाडा) आदींची मदत घेणार असल्याचे पवार म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...