आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गुण; चुकीच्या प्रश्नाचे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो... - Divya Marathi
सांकेतीक फोटो...

पुणे- इयत्ता  बारावीच्या  रसायनशास्त्र विषयाच्या  पेपरमध्ये चार  प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे मान्य करत, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना  या प्रश्नांचे सात गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे सात गुण प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणार नाहीत तर ज्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच विद्यार्थ्यांना  हे सात गुण मिळतील, असे मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी येथे सांगितले.  


रसायनशास्त्र विषयाचे पेपर तपासणीचे मुख्य नियामक असणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हे सात गुण देण्यात यावे, अशी शिफारस केली होती. याविषयी राज्य शिक्षण मंडळाने अभ्यास केला. तज्ज्ञांशी चर्चा केली. दुसऱ्या शक्यताही पडताळून पाहिल्या. त्यासाठी मंडळात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत सर्व बाजूनी चर्चा केल्यावर ज्या विद्यार्थ्यांनी  हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून सात गुण त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे काळे यांनी स्पष्ट केले.  


प्रश्नपत्रिकेत किरकोळ चुका
रसायनशास्त्र प्रश्नपत्रिकेतील चुका या किरकोळ स्वरूपाच्या होत्या, असा तज्ज्ञांचा अहवाल आहे.  तरीही विद्यार्थ्यांना  या गुणांचा फटका बसू नये, हा विचार करून मंडळाने ह प्रश्न सोडविण्याच्या  प्रयत्नांतील विद्यार्थ्यांना सात गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न क्रमांक २ मध्ये ‘गिव्ह टू युजेस’ असे विचारण्यात आले होते, असे स्पष्टीकरण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिले.

 

चुकांची हॅट््ट्रिक ? 
बोर्डाच्या  रसायनशास्त्राच्या  पेपरमध्ये सातत्याने  चुका असल्याचे निदर्शनास येत आहे. २०१६ मध्ये  अशाच चुकांमुळे विद्यार्थ्यांना ७ गुण मिळाले होते. २०१७ मध्येही प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारल्याने ३ गुण देण्यात आले होते. यंदा पुन्हा चुकीच्या प्रश्नांमुळे सात गुण देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील चुकांची मंडळाने ‘हॅट््ट्रिक’ केल्याची चर्चा अाहे.

बातम्या आणखी आहेत...