पुणे - काटेपिंपळे येथील लष्काराच्या हद्दीतून जाणारा रस्ता आज, मंगळवारी सकाळपासून कायमचा बंद करण्यात आला आहे. हा रस्ता सामान्य नागरिकांना खुला ठेवणे औंध मिलिटरी कॅम्पसाठी धोकादायक असल्याचे लष्कराचे म्हणणे होते. ते मान्य करून न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणा-या सुमारे दीड लाख नागरिकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. येथील कुंजीरवस्ती ते रक्षक चौक या दरम्यानचा 650 मीटरचा हा रस्ता आहे.
असे आहे प्रकरण
यापूर्वी सांगवीमध्ये कुंजीरवस्ती ते औंध हॉस्पिटल या दरम्यानचा लष्काराच्या हद्दीतून जाणारा रस्ता लष्काराने 1997 साली बंद केला होता. त्याला पर्यायी रस्ता म्हणून कुंजीरवस्ती - रक्षक चौक हा रस्ता सुरू करण्यात आला. मात्र, जानेवारी 2013 मध्ये हा रस्ताही बंद करण्याचा निर्णय लष्कराने घेतला व त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्र पाठविण्यात आले. पुढे येथील रहिवाशांनी न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. पण हा रस्ता नागरिकांना खुला ठेवणे औंध मिलिटरी कॅम्पसाठी धोकादायक असल्याचे लष्कराने म्हणणे कोर्टाने मान्य केले, व रस्ता कायमचा बंद करण्याचे आदेश दिले.
दीड लाख प्रवाशांना फटका - नेहमीच्या वर्दळीचा हा रस्ता बंद झाल्याने पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी आणि पिंपरी येथील सुमारे दीड लाख रहिवाशांना याचा फटका बसणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी केले आहे. कुंजीरवस्ती ते जगताप डेअरी असा पर्यायी रस्ता सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही जाधव यांनी सांगितले.
असा लावला फलक
कुंजीरवस्ती येथे बॅरीगेट्सवर फलक लावण्यात आला आहे. त्यावर लिहीले की, 'काटेवस्ती - शेलारवस्ती - कुंजीरवस्ती - रक्षक चौकाकडे जाणारा रस्ता उच्च न्यायालयात्या आदेशानुसार 20/10/2015 सकाळी सहा वाजल्यापासून कायमस्वरूपी बंद करण्यात आला असून, नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा.' औंध, शिवाजीनगर आणि पुण्याला जाण्यासाठी नागरिक या रस्त्याचा वापर करीत होते, पण आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अशा प्रकारे केला रस्ता बंद..