Home »Maharashtra »Pune» Aadhar Card Problem In Pune

'आधार'साठी पुणेकरांची वणवण; तासन् तास घालवावे लागत आहेत रांगेत, नवी नोंदणीही अवघडच

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 15:49 PM IST

  • आधारची माहिती अपडेट करण्यासाठी पुणेकरांना अक्षरश: वणवण करावी लागत आहे. (सांकेतिक फोटो)
पुणे- आधारची माहिती अपडेट करण्यासाठी पुणेकरांना अक्षरश: वणवण करावी लागत आहे. बीएसएनएल आणि पोस्टाच्या कार्यालयांमध्ये यंत्रणा सुरू होऊनही नागरिकांना आधारसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे आधारशी सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडण्याचा घाट घातला जात असताना नागरिकांची माहितीच अपडेट होत नसल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात सुरूवातीला पोस्ट आणि त्यानंतर बीएसएनएलमार्फत आधार अपडेट करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली. शहरात असलेली खासगी आधार केंद्र अचानक बंद पडल्याने टपाल खाते आणि बीएसएनएलच्या केंद्रांनी काही काळ नागरिकांना दिलासा दिला होता. परंतु सध्या आधारच्या सर्व्हरवर वारंवार ताण येत असल्याने माहिती अपडेट करण्याच्या प्रक्रियेला पुन्हा विलंब होत असून नागरिकांना तासन् तास रांगांमध्ये थांबावे लागत आहे. काही जणांच्या हाताचे ठसे जुळत नाहीत, काहींच्या डोळ्यांच्या बुबुळामध्ये बदल झाला आहे, अशा प्रकारच्या अनेक अडचणी घेऊन नागरिक आधार केंद्रांवर जातात. मात्र, टपाल खाते आणि बीएसएनएलच्या ग्राहक निवारण केंद्रांवरुन अनेकांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे.

आधारच्या यंत्रणेनुसार कागदपत्रे पूर्ण असतील तर एका व्यक्तीची माहिती अपडेट करण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. बऱ्याचदा सर्व्हर डाऊनच्या तक्रारींमुळे हा कालावधी लांबतो. सध्या सुरू असलेल्या आधार केंद्रांवर ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळत असून एका दिवसाला केवळ 10 ते 15 लोकांची माहितीच अपडेट होत आहे. बीएसएनएलकडून सातारा रस्ता, बाजीराव रस्ता, मॉडेल कॉलनी, धनकवडी, हडपसर, चिंचवड आणि भोसरी येथील ग्राहक सेवा केंद्रांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या ठिकाणीही माहिती अपडेट करण्यासाठी नागरिकांना तासन् तास रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे.
बीएसएनएलकडून नव्या आधार नोंदणीची केंद्रही सुरू करण्यात येणार होती. त्याचाही अजून पत्ता नाही. त्यामुळे, आता नागरिकांनी आधारसाठी जावे तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात अगदी तुरळक ठिकाणी नव्या आधार नोंदणीची केंद्रे आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended