आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांना ओढ संतश्रेष्ठांच्या पालखी सोहळ्याची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आषाढी वारीसाठीच्या पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यापर्यंत आली असून वारकºयांचे जत्थे देहू-आळंदीच्या दिशेने येऊ लागले आहेत. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 29 जूनपासून देहू येथून सुरू होणार असून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 30 जूनपासून आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे.
तुकोबांच्या पालखीचा मार्ग : दोन्ही पालखी सोहळ्यांचे मार्ग परंपरेनुसार आखलेले असून दिवसभराच्या वाटचालीत चार विश्रांती आणि एक विसावा, असा क्रम असेल. तुकोबांची पालखी 29 जूनला श्रीक्षेत्र देहू येथून तेथीलच इनामदार वाडा येथे मुक्कामास जाईल. 30 जूनला तुकोबांची पालखी देहूकडून आकुर्डी येथे मुक्कामास येईल. एक जुलैला पालखी कासारवाडी, दापोडीमार्गे मुक्कामाला पुण्यात येईल. पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम दोन दिवस असतो. तीन जुलैला पालखीचे प्रस्थान हडपसरमार्गे लोणी काळभोर, पुढे यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सणसर, अंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी आणि पंढरपूर अशा मार्गाने तुकोबांची पालखी प्रस्थान ठेवेल.
ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पाल खी सोहळ्याचा प्रारंभ आळंदी येथून 30 जून रोजी होईल. सकाळचा विसावा, दुपारचा नैवेद्य आणि दुपारचा विसावा अशी मार्गक्रमणा असेल. एक जुलै रोजी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असेल. दोन जुलैला पालखीचा मुक्काम पुण्यातच असेल. तीन जुलैला पहाटे हडपसर मार्गे पालखी दिवे घाटातून सासवड मुक्कामी जाईल. त्यानंतर जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, शेगाव, वाखरी आणि पंढरपूर या मार्गाने जाईल.

रिंगणांचे आकर्षण
संत तुकोबा आणि संत ज्ञानेश्वर या दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये मार्गात होणारी रिंगणे हा भक्तांच्या आनंदाचा ठेवा असतो. या वर्षी तुकोबांच्या पालखी सोहळ्यात 9 जुलैला पहिले गोल रिंगण बेलवडीला तर दुसरे गोल रिंगण 14 जुलैला माने विद्यालयात होईल. पाठोपाठ 15 जुलैला माळीनगरला उभे रिंगण होईल. 18 जुलैला वाखरीत उभे रिंगण होईल.

7 जुलैला नीरास्नान
संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलैला नीरास्नान, नऊ जुलैला उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे तर 14 जुलैला सदाशिवनगर, 15 जुलैला खुडुसफाटा येथे गोल रिंगण, 16 जुलैला ठाकूरबुवांची समाधी येथे गोल रिंगण, तर 17 जुलैला बाजीरावाची विहीर येथे गोल व उभे अशी दोन्ही रिंगणे होतील. 18 जुलैला वाखरीला अखेरचे उभे रिंगण होईल.

(संग्रहित छायाचित्र)