पुणे- कल्याणी फोर्ज कंपनीचे अकाऊंटंट निलेश गायकवाड याने चाकण येथे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये विष प्राशन करुन त्याने आयुष्य संपवले. निलेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘कल्याणी फोर्ज’ कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचे नाव आहे.
चाकण येथील गंधर्व हॉटेल मध्ये निलेश तीन दिवसापासून रहायला आला होता. मात्र दोन दिवसांपासून त्याने दरवाजा न उघडल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला. त्यानंतर निलेशने रुममध्येच आत्महत्या केल्याचे समोर आले. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘कल्याणी फोर्ज’ कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचे नाव आहे. अमित कल्याणी यांना एका व्यवहारासाठी निलेशने 15 कोटी रुपये घेऊन दिले होते. त्यापैकी साडे अकरा कोटी रुपये अमित यांनी परत केले. मात्र उर्वरित रक्कम आणि निलेशचे 60 लाखाचे कमिशन देण्यास अमित टाळाटाळ करत होते.
तर दुसरीकडे 15 कोटी रुपये देणारी संबंधित व्यक्ती निलेशच्या मागे पैशासाठी तगादा लावून बसली होती. यातच त्याने टोकाचं पाऊल उचलले. या घटनेनंतर कंपनीचे मालक अमित कल्याणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.