पुरंदर, जि. पुणे - 'अच्छे दिन आयेंगे' अशी घोषणा देणारे
नरेंद्र मोदी आता ‘जल्दी ठीक हो जायेगा' असे सांगत वेळ मारून नेत आहेत. पुण्यात तयार होणा-या गाडीत बसून ‘साठ वर्षांत या देशात काहीच झाले नाही,' असा अपप्रचार करतात, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधानांवर टीका केली. ‘उद्योगपती, श्रीमंतांसाठी काम करणा-यांना जनतेने घरी पाठवावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.
पुरंदर (जि. पुणे) येथे शुक्रवारी आयोजित प्रचारसभेत गांधी बोलत होते. जेमतेम १७ मिनिटांच्या भाषणात गांधी यांनी यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयांची उजळणी केली. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र उल्लेखही त्यांनी केला नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या वेळी उपस्थित होते. मोदी सरकारच्या कामगिरीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "पाकिस्तानला घाबरवून टाकीन, चीनला काबूत ठेवीन, असे दावे लोकसभा निवडणुकीपूर्वी केले गेले. परंतु गेल्या दहा वर्षांत झाली नाही एवढी फायरिंग सध्या पाक सीमेवर सुरू आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर मोदी अहमदाबादेत झोपाळा खेळत होते तेव्हा लाखो चिनी सैनिक लडाखमध्ये घुसले होते. मात्र स्वतःच्या'इमेज'ची चिंता वाहणा-या मोदींनी चीनला खडसावून जाब विचारला नाही,’ असा आरोपही त्यांनी केला.
गांधींनी जिंकली मने
मुद्देसूद भाषणातून गांधींनी श्रोत्यांवर प्रभाव पाडला. शेतकरी, आदिवासींच्या रक्षणाचे कायदे बदलणारे मोदी सरकार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. ‘अच्छे दिन आए क्या?’ असा प्रश्न विचारताच प्रेक्षकांनी खळाळून हसत दाद दिली.
पृथ्वीराजांची स्तुती
‘साफ आदमी' आणि ‘दिल से काम करने वाले' या शब्दांत राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले. ‘चव्हाणांना महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस पहिल्यांदाच स्वबळावर लढत आहे. त्यामुळे आमच्या पक्षालाच बहुमत द्या,' असे आवाहन करत त्यांनी चव्हाण यांच्यावरील विश्वास व्यक्त केला.
सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा
मजूर, शेतकरी, कामगारांच्या घामातून देश उभा आहे. तरी ६० वर्षांत काहीच घडले नसल्याची टीका मोदी करतात. ६० वर्षांत जे झाले नाही ते एक व्यक्ती करणार असल्याची स्वप्ने आता दाखवली जात आहेत. परंतु गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढेच असल्याचे गांधी म्हणाले.