पुणे- मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त याने
आपल्याला 14 दिवसांची पॅरोल (संचित) रजा मिळावी यासाठी येरवडा कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला आहे. त्याने यावेळी रजेसाठी कोणते कारण दिले आहे हे अद्याप समोर आलेले नाही. येरवडा कारागृह प्रशासनाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी त्याला सुटी मिळणार का याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
संजय दत्त हा सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात आहे. संजय दत्तने गेल्या वर्षी पत्नी मान्यता आजारपणाचे कारण सांगून तीन वेळा संचित रजा घेतली होती. आता वर्षभराच्या आतच पुन्हा संजयने संचित रजेसाठी अर्ज केल्याने सर्वांच्या भवया उंचावल्या आहेत. कारण संजय दत्तला चार महिन्याच्या आतच सलग तीनदा संचित रजा मंजूर झाली होती. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील व येरवडा कारागृह प्रशासनावर त्यावेळी माध्यमातून टीका झाली होती. इतर कैद्यांना एक न्याय व संजय दत्तला दुसरा न्याय अशी टीका झाली होती. त्यानंतर मागील 10-11 महिन्यांपासून संजय दत्तने कोणत्याही रजेसाठी अर्ज केला नाही. मात्र, आता वर्षअखेरीस संजय दत्तने पुन्हा एकदा सुटी मागितली आहे. गेल्या वर्षीही तो डिसेंबर माहिन्यात रजेवर होता.
कारागृहातील प्रत्येक कैद्यांना 14 दिवसांची हक्काची रजा देण्यात येते. वर्षातून एकदा अशा प्रकारची रजा दिली जाते. या प्रकरणी संजय दत्त याने यापूर्वी दीड वर्षाची शिक्षा भोगलेली आहे. आता तो उरलेली शिक्षा भोगत आहे. दरम्यान, अमिर खानचा बहुचर्चित चित्रपट
पीके हा 19 डिसेंबरला रिलिज होत आहे. त्यात संजय दत्तची छोटी व महत्त्वाची भूमिका आहे. याचबरोबर ख्रिसमस व न्यू इयर सेलिब्रेशनचा बॉलिवूड मंडळीत मोठा उत्साह असल्याने संजय दत्तने सुटी मागितली असण्याची शक्यता आहे. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल.