पुणे - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येऊन एक महिन्याचा कालावधी उलटला. या काळात रुपयाची घसरण थांबली, सोने स्वस्त झाले, शेअर बाजारात सुधारणा झाली, या सकारात्मक गोष्टी आहेत. रेल्वे दरवाढीसारख्या काही गोष्टी आपण सहन केल्या नाहीत तर सुधारणा होणार कशी?’ असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला.
यूपीए सरकारने घेतलेल्या दरवाढीच्या निर्णयाचीच मोदी सरकार अंमलबजावणी करत आहे. सरकार कोणतेही असले तरी त्यास जनतेने सहकार्य केले पाहिजे, त्याशिवाय शासन चालत नाही. आपल्याला महामार्ग हवा, मात्र टोल नको आहे. टोलनाके तोडफोड करून आपलेच नुकसान होत आहे. देशाचे संरक्षण महत्त्वपूर्ण असून सीमेवरील सैनिक जाती धर्म विसरून प्रतिकूल हवामानात आपले संरक्षण करतात. त्यांच्यावरील संरक्षण खर्चात वाढ झाली पाहिजे. मोदी सरकारला पहिले काही दिवस कठीण पावले उचलावी लागतील, अशी अपेक्षाही गोखलेंनी व्यक्त केली.
निवृत्त सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बाजीराव आवाड यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी गोखले यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपाचे खंडन करताना गोखले म्हणाले की, ‘काही भुक्कड लोकांनी खोटी तक्रार केली असून पोलिसांनी चौकशी न करता थेट गुन्हा दाखल केला. या घटनेशी माझा संबंध नसून आवाड यांनी पोलिसांशी असलेल्या संबंधाचा गैैरफायदा घेऊन खोटी तक्रार दिली आहे,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
माध्यमांना जबाबदारी हवी
गोखले म्हणाले, प्रकाशातील लोकांचे आयुष्य मीडियामुळेच मोठे होते. मात्र, त्यानंतर अशा माणसांवर चिखलफेक करण्यापूर्वी एखाद्या प्रकरणाबाबत विचारणा झाली पाहिजे. माझी राष्टÑपतींपासून अनेक मोठ्या लोकांपर्यंत ओळख आहे. मात्र, माझ्याविरोधात तक्रार दाखल करणार्या भुक्कड लोकांना गल्लीबाहेर कोणी ओळखत नाही. बहुतांश वृत्तपत्रे राजकीय विचारांना विकली गेली असली तरी माध्यमांनी जबाबदारीने वागले पाहिजे,’ असा सल्लाही त्यांनी दिला.