आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adhalrao Patil News In Marathi, Nationalist Congress, Devdutta Nikam

आढळराव पाटील यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी राष्‍ट्रवादीचे देवदत्त निकम रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजीराव आढळराव - Divya Marathi
शिवाजीराव आढळराव

पुणे - पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव आहेत. खासदार होण्यापूर्वी ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. ते देखील याच कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. वरपांगी हा सामना आढळराव विरुद्ध निकम असा दिसला असला तरी प्रत्यक्षात तो आढळराव विरुद्ध विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांच्यात आहे. अजित पवारांना शिरूरमध्ये फडकणारा भगवा सलतोय. आढळराव यंदा ‘हॅट्ट्रिक’ साधण्याच्या बेतात आहेत. म्हणूनच शिरूरमधला संघर्ष प्रस्थापितांमधल्या प्रतिष्ठेचा आहे.


संगणक क्षेत्रातील अग्रगण्य उद्योजक शिवाजीराव आढळराव-पाटील हे मुळात दिलीप वळसे-पाटील यांचे दोस्त. या दोस्तीमुळेच आढळरावांचा राजकारणात सहज प्रवेश झाला. वळसे यांचे वर्चस्व असलेल्या भीमाशंकर कारखान्याचे चेअरमनपद आढळरावांना मिळाले. औद्योगिक जगताला आढळरावांची ओळख पूर्वीपासूनची. देशाच्या संरक्षण विभागासाठी अतिमहत्त्वाच्या भागांची निर्मिती करणारा हा उद्योजक 1994 मध्ये जागतिक मराठा चेंबर ऑफ असोसिएशनचा कार्याध्यक्ष होता. ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबात जन्माला येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत आढळरावांनी मजल मारली. देश-विदेश फिरणारा, दिल्ली-मुंबईच्या औद्योगिक जगतात ऊठबस असणारा पुणे जिल्ह्यातला हा उद्योजक शरद पवार यांच्या नजरेत आला नसता तरच नवल. आढळरावांची पवारांबरोबर सलगी जमायला वेळ लागला नाही.


प. महाराष्ट्रात खाते उघडले
राजकीय पटलावर प्रवेश झालेल्या आढळरावांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. 2004 ची लोकसभा निवडणूक ‘राष्ट्रवादी’कडून लढण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. आढळरावांना तिकीट देण्यास पवारांना अडचण वाटत नव्हती. वळसेंचा मात्र विरोध झाला. वळसे आणि आढळरावांमधली मैत्री संपून कटुता सुरू होण्यास हे निमित्त झाले. इर्षेला पेटलेल्या आढळरावांनी ‘भीमाशंकर’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत थेट ‘मातोश्री’ गाठली. बाळासाहेब ठाकरे यांनी आढळरावांना शिरूरसाठी शिवसेनेचे तिकीट दिले. 2004 ची निवडणूक आढळरावांनी अत्यंत त्वेषाने लढवली आणि त्यांच्या रूपाने शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात पहिला खासदार मिळाला.


पवारांनीही जाणले वर्चस्व
‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून पहिलीच निवडणूक त्यांनी 20 हजार मतांनी जिंकली. नंतर 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. कन्येच्या पहिल्याच निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्याची शरद पवार यांची तयारी नव्हती. सुळेंसाठी बारामती सोडून स्वत: शिरूरमधून लढण्यासंदर्भातली चाचपणी पवारांनी सुरू केली. वैयक्तिक व विविध सर्वेक्षणांच्या अहवालांमध्ये आढळरावांचे पारडे भलतेच जड असल्याचे दिसून आले. आढळरावांच्या विरोधात तेव्हा शरद पवारांचा पराभव झाला असता असे नाही; परंतु विजयासाठी पवारांनासुद्धा प्रयत्न करावे लागले असते. शिरूरमध्ये पवारांचा वेळ गेला असता. हे टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी पवारांनी सोलापुरातल्या माढ्याची निवड केली.


अजित पवार यांना यश बोचले
‘पवारांच्याच पुण्यात पवारांना टक्कर देणारा शिवसेनेचा खासदार’ अशी आढळरावांची प्रतिमा निर्माण झाली. 2009 च्या निवडणुकीत मतदारांनी ‘राष्ट्रवादी’पेक्षा 1 लाख 78 हजार मते जास्त देऊन आढळरावांना पुन्हा संसदेत पाठवले. आढळरावांच्या विजयापेक्षाही त्यांनी मिळवलेले विक्रमी मताधिक्य अजित पवार आणि दिलीप वळसे यांना बोचणारे ठरले. दोघांनीही ही बोच गेल्या पाच वर्षांत अनेकदा बोलून दाखवली. आढळरावांचा विजय ‘राष्ट्रवादी’साठी लाजिरवाणा असल्याचे सांगत अजित पवार खासगी बैठकांमध्ये कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढत राहिले.


दुस-या बाजूला आढळराव मात्र शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी दिल्लीत सुसंवाद टिकवून होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना अडचणीत आल्याचे बोलले जाऊ लागले तेव्हा आढळरावांचे नाव शिवसेना सोडू इच्छिणा-या नेत्यांमध्ये घेतले जाऊ लागले. आढळराव ‘राष्ट्रवादी’त परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. शरद पवार यांच्या उपस्थितीत आढळरावांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला. मात्र, या वेळी ‘राष्ट्रवादी’तले आढळरावांचे जुने विरोधक आडवे आले. ‘राष्ट्रवादी’तला प्रवेश हुकल्यानंतर आढळरावांनी ‘जीवात जीव असेपर्यंत शिवसेना सोडणार नाही,’ अशी घोषणा करून टाकली. आता आढळराव वेगाने कामाला लागले आहेत. अजित पवार, दिलीप वळसे यांच्याविरोधात तिखट भाषा वापरत आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या प्रस्थापितांना शिंगावर घेणारा रांगडा खासदार म्हणून लोकांचाही त्याला प्रतिसाद मिळतोय.

विरोधकांमधली फूट ‘महायुती’च्या पथ्यावर
* शिरूर मतदारसंघातील वल्लभ बेणके आणि दिलीप मोहिते या वजनदार आमदारांचे दिलीप वळसे यांच्याशी सख्य नाही. याचा फायदा आधीच्या दोन्ही निवडणुकांत आढळरावांना झाला.
* गेल्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे राष्ट्रवादीत गेल्याने आढळरावांचे नुकसान झाले होते; या वेळी पाचर्णे पुन्हा भाजपच्या बाजूने सक्रिय झाले आहेत.
* ग्रामपंचायतीशिवाय एकही निवडणूक न लढवता थेट लोकसभेची उमेदवारी निकम यांना दिल्याने ‘राष्ट्रवादी’च्या स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
* विरोधकांमधल्या नाराजांची नेहमीची साथ, मतदारांशी सततचा संपर्क आणि मोदी लाटेचा फायदा मिळण्याची आशा.
‘को-या पाटी’चा
फायदा ‘राष्ट्रवादी’ला
* दहा वर्षे खासदार राहिलेल्या आढळरावांच्या तुलनेत कोरी पाटी असल्याचा निकम यांना फायदा. प्रचारात तरुणांचा सहभाग वाढल्याचे चित्र.
* आढळराव आंबेगाव तालुक्यातले. आतापर्यंत आढळरावांना या तालुक्याने भक्कम मताधिक्य दिले. निकमही याच तालुक्यातील असल्याने मताधिक्य राखणे विरोधकांना अवघड.
* निकमांच्या अध्यक्षपदाच्या काळात तोट्यातला ‘भीमाशंकर’ फायद्यात आला. ऊस उत्पादकांना चांगला दर दिल्याचा त्यांना फायदा मिळेल.
* अजित पवार, दिलीप वळसे यांच्या धाकामुळे गटबाजी टाळून ‘राष्ट्रवादी’ एकदिलाने लढल्यास ‘घड्याळ ’ चालू शकते.


अजित पवारांचा डाव वळसे समर्थकांनी उधळला
शिरूरमधील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत ‘राष्ट्रवादी’चे आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थांवरही ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व आहे. एवढे असूनही आढळरावांच्या विरोधात लढण्यास ‘राष्ट्रवादी’तून कोणीच समोर येत नव्हते. दिलीप वळसे यांनीच हे आव्हान स्वीकारावे, यासाठी अजित पवार आग्रही होते; पण राज्यातील पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी कमी करण्याचा त्यांचा डाव लक्षात आल्याने वळसे पाटील समर्थकांनी तो उधळून लावला.