आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Mt Everest Summit, Giripremi Team Turns Gaze

अखेर मकालूवर तिरंगा फडकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे / सातारा - पराकोटीचे प्रतिकूल हवामान, साधनसामग्रीच्या मर्यादा आणि अपार परिश्रमांच्या जोरावर जगातील पाचव्या सर्वाधिक उंच हिमशिखरावर पुणेकर गिरिप्रेमी टीमने रविवारी तिरंगा फडकावला आणि एका वेगळ्या विक्रमाची नोंद केली. जगातील थ्री एट थाऊजंडर्स बनण्याचा मान आता गिरिप्रेमी टीमच्या नावावर जमा झाला आहे. तसेच गिरिप्रेमी सदस्य आशिष माने हा वैयक्तिकरीत्या महाराष्ट्रातील पहिला थ्री एट थाऊजंडर ठरला आहे.

सुमारे पस्तीस दिवसांपूर्वी गिरिप्रेमीची टीम जगातील पाचवे सर्वाधिक उंच हिमशिखर पादाक्रांत करण्यासाठी काठमांडूला रवाना झाली होती. मात्र, प्रत्यक्ष चढाईचे तीन प्रयत्न प्रतिकूल हवामान, साधनसामग्रीच्या मर्यादा तसेच मध्यंतरी एव्हरेस्ट परिसरात झालेला भीषण अपघात, या पार्श्वभूमीवर यशस्वी होऊ शकले नव्हते, तरीही गिरिप्रेमी टीमने माघार घेतली नाही. अखंड पर्शिम, जिद्द आणि देशाभिमान जागता ठेवल्याने टीमचे सदस्य आशिष माने, आनंद माळी यांनी माऊंट मकालू या आठ हजार चारशे 43 मीटर्स उंचीच्या शिखरावर रविवारी पहाटे चार वाजता तिरंगा फडकावला.

टीमच्या सदस्यांनी शेर्पा मित्रांच्या सहकार्याने 24 मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अंतिम चढाईला सुरुवात केली आणि पहाटे दोनच्या सुमारास ते शिखरावर पोचले. मात्र, अपुर्‍या प्रकाशामुळे शिखर गाठल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय त्यांना उजाडल्यावरच आला. तेथून शिखर सर केल्याचा संदेश त्यांनी लगेच टीमचे प्रमुख उमेश झिरपे यांना पाठवला आणि तेथून तो सर्वत्र पोचला. टीममध्ये उमेश यांच्यासह अजित ताटे, आनंद माळी व आशिष माने यांचा समावेश होता.
सलग तिसर्‍या वर्षीचे यश
गिरिप्रेमीच्या सदस्यांनी 2012 मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर केले. त्यानंतर 2013 मध्ये माऊंट ल्हात्सेवर यशस्वी चढाई केली आणि आता 2014 मध्ये माऊंट मकालूवर तिरंगा फडकावून नागरी गिर्याराहण मोहिमेत एका विक्रमाची नोंद केली.
अभिमान अन् काळजीही
मकालू हे शिखर एव्हरेस्टपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. ते चढाईला अत्यंत अवघड आहे. सातार्‍याच्या आशिषने 2012 मध्ये एव्हरेस्ट, 2013 मध्ये ल्होत्से, तर या वर्षी मकालू हे शिखर पादाक्रांत केले आहे. माने कुटुंबीयांनी त्याच्या या यशाचे कौतुक केले आहे. ‘आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, मात्र भेटेपर्यंत काळजी लागलेली असते,’ अशी प्रतिक्रिया ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.

(छायाचित्र - आशिष माने आणि आनंद माळी. )