शेगाव/बुलढाणा- शेगावचे संत गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा व नागपूरचे ताजुद्दीनबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या निषेधार्थ आज अकोला, चिखली, बुलढाणा आदी ठिकाणी सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. धोटे यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य पाहता ते मनोरुग्ण झाले असून, या बेताल वक्तव्याबद्दल त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी चिखली येथील गजानन महाराज भक्त मंडळाने पोलिसांकडे केली.
गजानन महाराज, साईबाबा व ताजुद्दीनबाबा हे अनेकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामागे मोठे धार्मिक अधिष्ठान आहे. मात्र धोटेंच्या वक्तव्यामुळे प्रक्षोभाचे वातावरण आहे. धोटे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून कारवाईची मागणी करण्यात आली. धोटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांचा शहरात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. सामान्य नागरिक व भाविकांनी स्वयंस्फूर्तपणे हा निषेध नोंदवला. धोटे यांनी नागरिकांची व भाविकांची तत्काळ माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली. अनेक ठिकाणी निषेधाचे फलक झळकले. विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. जिल्हा रुग्णालयातील रुग्ण सेवा समितीच्या वतीने धोटेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष व विधी विभाग, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, कास्ट्राइब संघटनेने निषेध व्यक्त केला. तसेच बसस्थानकासमोर मदनलाल धिंग्रा चौकात हरिहरपेठ स्थित गजानन महाराज मंदिर समिती व सूर्योदय भक्त परिवार, सहय़ाद्री संघटनेतर्फे धोटेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. भावनांशी खेळू नये, असा इशारा नागरिकांनी दिला.
धोटेप्रकरणी गुरुवारी श्री गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत नमूद आहे की, शेगाव संस्थानच्या वतीने सर्वसामान्य भाविकांसाठी विविध 42 सेवा प्रकल्प चालवले जातात. साई संस्थानच्या वतीने हजारोरुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. नागपूरचे ताजुद्दीनबाबा दर्गाच्या वतीने अनेक सामाजिक सेवा प्रकल्प राबवले जातात. या सर्व संतांच्या विरोधात धोटे यांचे वक्तव्य म्हणजे समाजातील भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणे होय. मोर्चात शहरातील भाविकांनी मोठय़ा संख्येने हजर होते असे गजानन महाराज सेवा समिती चिखलीच्या वतीने सांगण्यात आले.
(छायाचित्र: धोटेविरोधात नागरिकांनी आंदोलन केले)
पुढे वाचा, धोटे यांचा योगीराज व्यासपीठकडूनही धिक्कार