अहमदनगर- अहमदनगर जिल्हा बँकेच्या 15 संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत अखेर थोरात गटाची सरशी झाली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास पॅनेलने 21 पैकी 11 जागा जिंकत काठावर बहुमत मिळवले. थोरातांविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणून बॅंक ताब्यात घेण्याचे विखे-पाटलांना अखेर जमलेच नाही. विखे-पाटलांच्या गटाला 10 जागा मिळाल्या.
मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर आज सकाळपासून त्याचे निकाल जाहीर होऊ लागले होते. सकाळी 10 पर्यंत जाहीर झालेल्या 9 जागांपैकी राधाकृष्ण विखे-पाटील व भाजप-शिवसेनेच्या जिल्हा विकास आघाडीने 5 जागा
आपल्या खिशात घातल्या होत्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त शेतकरी विकास मंडळ पॅनेलला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे थोरात गटाला धक्का बसणार असे मानले जात होते. मात्र, उर्वरित 6 जागांपैकी 5 जागी बाजी मारत थोरात गटाने बॅंक आपल्या ताब्यात ठेवण्यात काठावर का होईना यश मिळवले.
21 जागांपैकी 6 जागी बिनविरोध उमेदवार निवडून आले होते. त्यात विखे-पाटील गटाला 4 तर थोरात गटाच्या दोन जागांचा समावेश होता. त्यामुळे आज 15 जागांसाठीच मतमोजणी झाली. त्यात थोरात गटाने 9 जागा जिंकल्या तर विखे-पाटील गटाने 6 जागा जिंकल्या. अखेर थोरात गटाने 11 तर विखे-पाटलांच्या गटाने 10 जागा जिंकल्या. त्यामुळे आजतागायत जिल्हा बॅंकेची सत्ता उपभोगलेल्या बाळासाहेब थोरातांना धक्का देण्याचे स्वप्न विखे- पाटलांचे भंगले.
बाळासाहेब थोरातांना यंदाच्या निवडणुकीत धोबीपछाड मिळणार असे बोलले जात होते. विखे-पाटील यांनी थोरात यांचे बॅंकेवरील वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप-शिवसेनेला सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करण्यात यश मिळवले होते. आता काही प्रमाणात नक्कीच यश मिळवले व सत्ता मिळवण्यात विखेंना पुन्हा एकदा अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
विखे व थोरात या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये निवडणुकीत चुरशीची लढत झाली. या दोन दिग्गज नेत्यांनी परस्परांना शह-काटशह देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे आजच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष आहे. विखे-पाटील यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना आपल्या गटात ओढले तर थोरात यांच्या गटाच्या बाजूने राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, आमदार अरुण जगताप अशी फौज होती. त्यामुळे नगर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची चर्चा राज्यभर झाली.
बिनविरोध झालेले संचालक : शिवाजी कर्डिले : नगर, उदय शेळके : पारनेर, अण्णासाहेब म्हस्के : राहाता, चंद्रशेखर घुले : शेवगाव, राजीव राजळे : पाथर्डी, अरुण तनपुरे : राहुरी.
पुढे वाचा, विखे-पाटलांनी घेतली होती मोठी मेहनत.. पण पदरी अपयशच...