आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Pollution In Diwali Festival Issue In Maharashtra

धडाडधूम कमी: दिवाळीत प्रदूषणाचे प्रमाण यंदा घटले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण घटल्याचा निष्कर्ष ‘सफर’ या संस्थेने काढला आहे. तुलनेने अधिक असणारे तापमान आणि फटाक्यांचे घटलेले प्रमाण ही प्रदूषण कमी होण्यामागील प्रमुख कारणे ठरल्याची माहिती ‘सफर’चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गुरफान बेग यांनी दिली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) येथे हवेतील धूलिकणांच्या मोजणीतून प्रदूषणाचे प्रमाण ठरवण्यासाठी ‘सफर’ ही प्रदूषण मापन यंत्रणा कार्यरत आहे. दिवाळीच्या दिवसांत विशेषत: लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दोन दिवशी फटाक्यांच्या अतिरेकामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक असते. यंदा ते बरेच कमी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत हवेने अतिधोकादायक पातळीही ओलांडली होती. तुलनेत या वर्षी प्रदूषणाचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे डॉ. बेग म्हणाले.

फटाके उडवण्याचे प्रमाण कमी : सफरचा निष्कर्ष
कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचे फटाके यंदा लक्षणीय प्रमाणात घटल्याने ध्वनिप्रदूषणाची पातळीही घटल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा दिवाळीतले तापमान अधिक होते. तसेच फटाके उडवण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आवाजी फटाक्यांऐवजी रोषणाईचे फटाके अधिक उडवले गेले. त्यामुळे ही घट झाली, असे मत ‘सफर’ प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकारी नेहा पारखी यांनी नोंदवले.

ही आहेत निरीक्षणे
>लक्ष्मीपूजनाला हवेतील दहा मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाच्या धूलिकणांचे प्रमाण प्रत्येक घनमीटरमागे १०८.५४ मायक्रोग्रॅम इतके होते.

>पाडव्याला हेच प्रमाण प्रत्येक घनमीटरमागे १५४.१८ मायक्रोग्रॅम इतके नोंदले गेले.

>हे प्रमाण हवेची मध्यम दर्जाची गुणवत्ता दर्शवणारे आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण अनुक्रमे प्रत्येक घनमीटरमागे १२४.९५ आणि १८८.७९ इतके होते.

>अतिसूक्ष्म धूलिकणांचे म्हणजेच २.५ मायक्रोमीटरपेक्षाही लहान असणाऱ्या धूलिकणांचे प्रमाणही यंदा घटले आहे. हे प्रमाणही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत बरेच कमी आहे.