आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता विमान, अधिकाऱ्यांच्या शोधात वायुसेनेला रस नाही, शंभर दिवसांपूर्वी बेपत्ता झाले हाेते विमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बंगालच्या उपसागरात शंभर दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या वायुसेनेच्या विमानाचा आणि त्यातील २९ वायुसेना कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यास भारतीय वायुसेनेला रस उरलेला नाही. वायुसेनेचे अधिकारी आणि यंत्रणा या विमानाचा, त्यातील कर्मचाऱ्यांचा खोल समुद्रात शोध घेण्यास असमर्थ ठरले आहेत, असा आरोप या विमानासोबत बेपत्ता झालेल्या फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचे वडील राजेंद्र आणि आई विद्या बारपट्टे यांनी सोमवारी पत्रकारांशी बाेलताना केला. गेल्या शंभर दिवसांपासून आम्ही वायुसेना कार्यालयाकडून योग्य व अद्ययावत शोधमोहिमेची अपेक्षा करत आहोत, पण अधिकृतपणे आम्हाला कुणीच काहीही कळवण्याची तसदी घेतलेली नाही, असेही बारपट्टे म्हणाले.

२२ जुलै २०१६ रोजी भारतीय वायुसेनेचे विविध प्रकारची वाहतूक करणारे विमान एएन ३२ (मल्टि रोल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट) बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाले. या विमानात आमचा पुत्र फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे याच्यासह सहा वायुसेना अधिकारी व अन्य २३ जणांचा समावेश होता. हे विमान चेन्नई येथील बांबारम् विमानतळावरून पोर्ट ब्लेअरकडे निघाले होते. ही विमाने ताफ्यातून वगळण्याऐवजी त्यांची डागडुजी आणि आधुनिकीकरण करून वापरली जात होती, अशी माहिती मिळाली आहे. वायुसेनेच्या कुठल्याही उड्डाणापूर्वी जी काळजी घेतली जाते, ती या उड्डाणाच्या वेळी घेतली गेली नव्हती, असा अाराेपही बारपट्टे कुटुंबीयांनी केला. या पार्श्वभूमीवर वायुसेना मुख्यालयाकडून अयोग्य भाषेत पत्रव्यवहार केला जात आहे. विमान रडारवरून नाहीसे होताक्षणीच शोधकार्य सुरू का केले नाही, हा आमचा प्रश्न आहे, असे सांगताना बारपट्टे दांपत्याचा गळा दाटून आला होता.

हे आहेत अाक्षेप
- असुरक्षित हवामान असूनही विमानाच्या उड्डाणाला परवानगी कशी दिली गेली?
- शोधकार्य करणाऱ्यांना विमानांचे सिग्नल्स का मिळाले नाहीत?
- आणीबाणीप्रसंगी विमानातील इमर्जन्सी लोकेशन यंत्रणा चालू कशी नव्हती?
- समुद्रावरून प्रवास करताना अनिवार्य असणारी पाण्याखालील सिग्नल देणारी यंत्रणा विमानात का नव्हती?
- शोधकार्य करणारे ‘सागरनिधी’ जहाज ३५०० मीटरपेक्षा खोल सागरात शोध घेण्यास असमर्थ कसे ठरले?
- रिमोट ऑपरेटेड व्हेईकल सक्षम होते का?
- शोधकार्याचे नियोजन, वेळापत्रक यात ताळमेळ वायुसेनेने राखला नाही.
शंकांचे समाधान करा
केवळ आमचा पुत्र म्हणूनच नव्हे तर भविष्यात देशाचा कुठलाच सुपुत्र अशा प्रकारे धोक्यात येऊ नये, अशीच आमची इच्छा आहे. या विशिष्ट विमानाची आम्ही मागितलेली सर्व माहिती व आम्हाला छळत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे भारतीय वायुसेनेने लवकरात लवकर आम्हाला द्यावीत.
राजेंद्र आणि विद्या बारपट्टे
बातम्या आणखी आहेत...