आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंड बोडके सीएमना भेटतोच कसा, अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील गुंड बाबा बोडके याने मुंबईत ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे छायाचित्र गेल्या आठवड्यात ‘व्हायरल’ झाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे याच बोडकेने काही वर्षांपूर्वी अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तेव्हाही आतासारखीच राजकीय टीका झाली होती.

चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर बोडकेची भेट अनावधानाने झाल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. बोडके कोण, हे मुख्यमंत्र्यांना माहिती नसल्याचा खुलासा भाजपने केला. विकासकामांच्या उद््घाटनासाठी सोमवारी पुण्यात आलेल्या अजित पवारांनी मात्र हा खुलासा साफ फेटाळून लावला. “मी फोटो बघितले आहेत. हे आता सांगतात हावरे मिस्टर आणि मिसेस आले होते आणि त्यांनी त्याला (बोडकेला) आणले होते. मग हावरेंच्या बरोबर कोण आले ते पहिल्यांदा यांच्या लक्षात यायला नको का, तो बिनहावरा आहे का आणखी कोण? यांना कळायला नको होते का?” असा सवाल करून मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक गुंड बोडकेची भेट घेतल्याचा आरोप पवार यांनी अप्रत्यक्षपणे केला.

पवार म्हणाले, मीदेखील चार वर्षे उपमुख्यमंत्री होतो. ‘वर्षा’वर जायचे तर पहिल्यांदा अपॉइंटमेट घ्यावी लागते. उद्योगपती असेल, खासदार-आमदार असेल तरी आपण कोणत्या गाडीने येणार आहोत, हे अपॉइंटमेंट घेऊन सांगावे लागते. गेटवर गाडी अडवली जाते. तीच व्यक्ती आली आहे का, गाडीत इतर कोण आहेत हे चेकिंग होते. मग चार पायऱ्या चढून ‘वर्षा’वरच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये आतमध्ये जाता येते. गुंड बोडकेची ‘वर्षा’वरील मुख्यमंत्र्यांची भेट पूर्वनियोजित असल्याचा तर्क पवारांनी सकाळी लावल्यानंतर त्याचे पडसाद महापालिकेतही उमटले. महापालिकेतही या मुद्द्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी “बोडके प्रकरण म्हणजे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव आहे,” असा आरोप केला. “मुख्यमंत्री फडणवीस असोत की गोपीनाथ मुंडे, गुन्हेगारीच्या विरोधात रान उठवण्याचे काम आम्ही केले. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद््भवत नाही,” असे ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कोणालाही तिकीट देणार नसल्याचेही बापट यांनी जाहीर केले. काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रवादी’चा नगरसेवक पिंटू धाडवे यासह पप्पू घोलप आणि श्याम शिंदे यांना भाजपत प्रवेश देण्यात आला. या तिघांवरही पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मुख्यमंत्र्यांची तंबी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुकांची आवक सुरू झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे, अमर साबळे यांच्यासह महापालिकेतील भाजप पदाधिकारी व आमदार यांच्यात इतर पक्षांमधले कार्यकर्ते आणण्याची जणू चुरसच लागली आहे. या मंडळींना थेट ‘वर्षा’वर नेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचे कार्यक्रम होत आहेत. बोडके प्रकरणाचा चटका बसल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील अतिउत्साही भाजप नेत्यांना तंबी दिली आहे.
पवार-ठाकरेंच्याही राशीला बोडके
कुख्यात गुंड बोडके याने अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्या वेळी ‘वाल्याचा वाल्मीकी करू,’ असे उद््गार पवार यांनी काढले होते. मात्र, त्यावरून जोरदार टीका झाल्यानंतर बोडकेची ‘राष्ट्रवादी’तून हकालपट्टी करण्यात आली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याच बोडकेने ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाखत दिली होती. मात्र, सेनेने त्याला उमेदवारी नाकारली होती.
वाचाळांना आवर घाला
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील वाचाळांना आवर घालावा. काही मंत्री म्हणतात की बारा तासांत जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे. हे मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना घरचे सालगडी समजतात का?” असा सवाल पवारांनी केला. भगवानगडावरच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर जानकर यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची १२ तासांत बदली करण्याची मागणी केली होती.
बातम्या आणखी आहेत...