आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांसाठी बाजार समिती निवडणुकीत बदल, अजित पवार यांचा भाजप सरकारवर आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - तज्ज्ञ संचालक, संचालक व प्रशासक  या गोंडस नावाखाली भाजप कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेण्याचा हेतूने राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घाईघाईत घेतला.
 
मात्र, त्यामागे खरे कारण वेगळेच  आहे. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख सोलापूरमधून निवडून आले आहेत. मात्र, तेथील बाजार समिती दिलीप माने गटाकडे आहे. मानेंना प्रचलित पद्धतीने पराभूत करून बाजार समिती निवडणूक देशमुख यांना जिंकता येत नाही.
 
प्रचलित पद्धतीने निवडणुका झाल्यास देशमुखांचा तेथे टिकाव लागत नाही. म्हणूनच बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये प्रक्रियेत सरकारने बदल केला आहे. केवळ देशमुखांच्या ताब्यात सोलापूर बाजार समिती आणणे हा यामागील एकमेव उद्देश आहे. म्हणूनच सर्व शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क दिला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती येथे शनिवारी केला. ते बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-लिलाव पद्धतीच्या उद््घाटनप्रसंगी बोलत होते.  

पवार म्हणाले, पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीवर काम करण्यासाठी तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, हमाल मापाडी, तसेच मागास वर्गाला प्रतिनिधींना संधी मिळत असे. मात्र, बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मतदानाचा हक्क बहाल केल्याने ही निवडणूक आमदारकीसारखीच होईल. संचालक मंडळाच्या निवडणुकांचा येणारा कोट्यवधींचा खर्च करण्याची कुवत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवाक्यात नाही, याचा विचार सरकारने केला नाही. भाजपतील कार्यकर्ते सामावून घेण्यासाठी सरकारने तज्ज्ञ संचालक बाजार समितीत नेमण्याची संकल्पना पुढे आणल्याचे ते म्हणाले.  
 
हात जोडून विनंती, भ्रष्टाचार करू नका  
पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक ७० कोटी रुपये नफ्यात आहे. केवळ स्वच्छ कारभार, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्था चालवल्याने बँकेला फायदा झाला आहे. मात्र, काही घोटाळे झाले नसते, तर नफा ९० कोटींच्या घरात गेला असता, असे सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थांवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे, भ्रष्टाचार करू नका, अशी हात जोडून विनंती केली.
बातम्या आणखी आहेत...