आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जिल्हा बँक अजित पवार यांच्या खिशात, भाजप- शिवसेनेला भोपळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (पीडीसीसी) २१ पैकी १९ जागा जिंकून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहाती सत्ता राखली. काँग्रेसचे २ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही.

'पीडीसीसी'च्या १५ जागांसाठी ४ मे रोजी मतदान झाले होते. आमदार दिलीप वळसे-पाटील, संग्राम थोपटे, माजी आमदार रमेश थोरात, चंदुकाका जगताप आदी ६ जणांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित १५ जागांसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि भाजप-सेना पुरस्कृत परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. यात अजित पवारांचे उमेदवार भक्कम मताधिक्याने विजयी झाले.

बारामती मतदारसंघातून स्वत: अजित पवार १७९ मते मिळवून जिंकले. त्यांचे विरोधक विलास काकडे यांना केवळ १३ मते मिळाली. "राष्ट्रवादी'चे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनीही ७९ मते मिळवून जोरदार विजय मिळवला. त्यांच्या विरोधी उमेदवाराला ५ मते मिळाली. बुधवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीपासूनच एकतर्फी निकाल येऊ लागल्याने "राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत गेला. भाजप-शिवसेना पुरस्कृत पॅनलचे नेतृत्व करणारे पालकमंत्री गिरीश बापट मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत.

जिल्हा अजितदादांचाच
जिल्ह्यातले २२ पैकी १५ आमदार आणि ४ पैकी ३ खासदार भाजप-सेनेचे असूनही या पक्षांना जिल्हा बँकेत शिरकावसुद्धा करता आला नाही. शिरूर गटातून निवडणूक लढवणा-या शिवसेनेच्या जयश्री पलांडे आणि खेड मतदारसंघातील भाजपपुरस्कृत लक्ष्मण टोपे या दोघांना शून्य मते मिळाली. येथील अर्थपूर्ण व्यवहारां'ची मतदारांमध्ये चर्चा होती.

६० वर्षांची सत्ता
जिल्ह्यात सहकारमहर्षी म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत शिवाजीराव काळे सतत ५० वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा संजय यंदा दुस-या वेळी विजयी झाला. त्यामुळे सलग ६० वर्षे एकाच घरात सत्ता टिकून राहण्याची दुर्मिळ घटना घडली.