आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, Someshwar Sugar Cooperative Factory, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमेश्वर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी ५९ कोटींचे लचांड अजितदादांच्या मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखऱ कारखान्यातील ५८ कोटी ९० लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचे लचांड लागण्याची चिन्हे आहेत. कारखान्याच्या सभासदांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून प्रादेशिक साखऱ संचालकांनीही त्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

विरोधकांच्या ताब्यात असलेला सोमेश्वर कारखाना अजित पवार यांनी दोन दशकांपासून स्वतःच्या अधिपत्याखाली आणला आहे. २०१३ पर्यंत पवार या कारखान्याचे संचालकही होते. गेल्या वर्षी त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला. अर्थातच कारखान्यावरील संचालक मंडळ मात्र पवार यांच्या इशाऱ्यावर चालणारेच आहे. पवारांनी राजीनामा देण्यापूर्वीच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण पवारांचे पारंपरिक विरोधक सतीश काकडे यांनी उजेडात आणले आहे. गेल्या पाच वर्षातील काही हिशोब आर्थिक ताळेबंदात दाखवण्याचे राहून गेले, अशी सबब सांगणारे पत्र "सोमेश्वर'च्या संचालक मंडळाने लेखा परीक्षकाकडून लिहून घेतले आहे. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत न दाखवलेला ५८ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च यंदाच्या ताळेबंदात ग्राह्य धरण्याचा प्रकार लेखापरीक्षकांनी केला. ५९ कोटींची अफरातफर लपवण्यासाठी हा प्रकार झाल्याचा आरोप आहे.

सोमेश्वर कारखान्याची सर्वसाधारण सभा गेल्याच आठवड्यात झाली. या सभेत ऊस तोडणी, वाहतूक आदींसाठी अदा केलेल्या ५८ कोटी ८० लाख रुपयांचा हिशोब दाखवण्यात आला नसल्याची तक्रार काकडे यांनी केली. सभेला उपस्थित असलेल्या अजित पवारांनीही गैरव्यवहार झाल्याचे तत्त्वतः मान्य केले. मात्र संचालक मंडळाने आपल्याला अंधारात ठेवल्याचे वक्तव्य पवारांनी करताच शेतकऱी संतापले. पवारांच्या इशाऱ्याशिवाय कारखान्यात पान हलत नाही. असे असताना त्यांच्याकडून भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत पवारांचे भाषण सुरू असताना लोक उठून गेले, असे काकडे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. सुमारे ५९ कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश पवारांनी दिलेले नाहीत, यावरूनच काय ते स्पष्ट होते, असे ते म्हणाले. कारखान्याचे सरकारी व खासगी ऑडिटर यांच्याबरोबरच २०१३ पूर्वी कारखान्यावर संचालक म्हणून कार्यरत असलेले अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी काकडे यांनी साखर संचालक यांच्याकडे केली आहे.

* ऐन निवडणुकीत दादा गोत्यात, साखर संचालकांची नोटीस

* आयुक्तालयावर दबाव
सोमेश्वर कारखान्यातील ५९ कोटी ९० लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण गंभीर आहे. आम्ही याची गांभीर्याने दखल घेतली असून कारखान्याच्या संचालक मंडळाकडे तातडीने तपशील मागवला आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. पवारांच्याच कारखान्यात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या दिवसात अडचणीचा ठरु शकत असल्याने या प्रकरणाची चौकशी लांबवण्यासाठी साखऱ संचालकांवर दबाव येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

* "छत्रपती'ही तोट्यात
सोमेश्वर'प्रमाणेच बारामतीजवळचा छत्रपती सहकारी साखर कारखानादेखील अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालतो. गेल्या काही वर्षांपासून हा कारखाना तोट्यातच आहे. त्यांचे खासगी कारखाने मात्र जोरात सुरू आहेत. आपल्या तालावर चालणारे संचालक मंडळ कारखान्यावर राहावे, यासाठी गेल्या दीड वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी निवडणूकसुद्धा रोखली आहे. या प्रकाराविरुद्ध इथला शेतकरी चिडलेला आहे.'
-पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, राज्य सहकारी साखर कारखाना संघ.