आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Not Spoke Well With Officers During Pune District Planning Board Meeting

अजितदादांची बेताल वाणी, बैठकीत काढला अधिका-यांचा ‘बाप’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - एरवी सर्वसामान्य जनतेपुढे अधिकाराची गुर्मी दाखवणारे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यांच्या ‘बापा’चा उद्धार झाल्यानंतरही तोंडात मिठाची गुळणी धरून गपगुमान बसल्याचे चित्र सोमवारी पुण्यात पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्यासह पुण्यातील अनेक ज्येष्ठ अधिकारीही यावेळी माना खाली घालून बसले होते... कारण प्रशासकीय अधिका-यांच्या ‘बापा’चा जाहीर उद्धार करणारे दुसरेतिसरे कोणी नव्हते, तर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारच होते.


हा प्रसंग घडला पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत. जिल्ह्यातले सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव, सर्व आमदार तसेच विविध संस्थांमधले अधिकारी, कर्मचारी बैठकीला उपस्थित होते. या वेळी अजित पवारांनी नेहमीच्या शैलीत अधिका-यांची खरडपट्टी काढली. शासकीय योजनांचा निधी खर्च होत नसल्याची तक्रार काही आमदारांनी केली. ही तक्रार येताच अजित पवार उसळले. संबंधित अधिका-यांना त्यांनी फैलावर घेतले. ‘पैसा काय तुमच्या बापाचा आहे का,’ असा सवाल करताच बैठक स्तब्ध झाली. नीट कामे झाली नाहीत तर सस्पेंड करीन, असा दमही त्यांनी भरला. अजितदादांना उत्तर देण्याचे धाडस एकाही अधिका-याने
दाखवले नाही.


पवार-पाटलांना हिसका
धरणात पाणीसाठा नसल्याने दीड वर्षापासून पुणेकरांवर पाणीकपात लादली आहे. यंदा सर्व धरणे तुडुंब भरल्याने पाणीकपात रद्द होण्याची अपेक्षा पुणेकर आमदारांना होती. परंतु पवार व पाटील यांनी पुण्याला नऊ-साडेनऊ टीएमसीपेक्षा एकही थेंब जादा न देण्याचा पवित्रा घेतला. त्याला भाजप आमदार गिरीश बापट व काँग्रेस आमदार दीप्ती चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘तुम्हीही पुण्यातच राहता आणि शहराचा विचार करत नाही,’ असे पवार-पाटील यांना सुनावण्यात आले. दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी झाली. पाणीकपातीचा निर्णय रेटून नेण्याचा पवार-पाटील यांचा प्रयत्न आमदारांनी उधळून लावला. त्यामुळे कालवा समितीची बैठक कोणत्याही निर्णयाविना गुंडाळण्याची पाळी पवार-पाटलांवर आली.