आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांबळेश्वर बंधा-याला अजित पवारांची भेट; नीरा नदीवरील वाळूचे लिलाव कायमचे बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बारामती- फलटण तालुक्याच्या सीमेवरील कांबळेश्वर येथे असलेल्या नीरा नदीपात्रावरील बंधाऱ्याच्या मो-या जिलेटिन स्फोटाने उडवल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी भेट दिली. यावेळी पाटबंधारे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या पुढे नीरा नदीतील वाळू उपशासाठी करण्यात येणारे ठेक्याचे लिलाव कायमचे बंद करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
दरम्यान, बंधा-याच्या मो-या जिलेटनच्या स्फोटाने उडवण्याचे धाडस करणा-या वाळू माफियांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या घटनेमुळे मात्र महसूल पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून ठिकठिकाणी छापासत्रही सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्याप एकही संशयित पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या भागातील वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे खरे आरोपी पकडले जातील काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाळू तस्करीत अडथळा ठरणा-या कांबळेश्वर येथील बंधाऱ्याच्या दोन ते तीन मो-या माफियांनी सोमवारी मध्यरात्री स्फोटाने उडवून दिल्या. घटनास्थळ फलटण पोलिस ठाण्याच्या येत असल्याने सातारा पोलिसांनी कारवाईची सूत्रे हलवली. या पोलिसांनी बारामती फलटण तालुक्यातील संशयित वाळू माफियांच्या घरावर छापा टाकला, मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने संशयित पसार झाले. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारणही केले, मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. दरम्यान, सोमवारी बंधारा उडवल्यानंतरही बराच वेळ वाळू उपसा सुरू होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
कठोर कारवाई करा- खासदार सुप्रिया सुळे

सामाजिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरच पकडू, असा विश्वास फलटणचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी व्यक्त केला आहे. तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुळे म्हणाल्या, बेसुमार वाळू उपशाने निसर्गाचे शोषण होत असून त्याचे दूरगामी परिणाम लोकांना भोगावे लागतील. सरकारसह लोकांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष करता वाळू माफियांवर कठोर कारवाईसाठी आग्रह धरावा. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी प्रशासनाने त्याची गय करू नये, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...