आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संमेलनात नाट्यरसिकांना मिळणार ‘वंशकुसुमा’ची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बेळगाव येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी येणार्‍या रसिकांना ‘वंशकुसुमा’ची खास भेट मिळणार आहे. बेळगावकरांनी या सुंदर शीर्षकाची स्मरणिका या संमेलनाच्या निमित्ताने तयार केली आहे. मराठी रंगभूमीचे आद्य मानकरी बेळगावमध्ये घडले, याचा सार्थ अभिमानही ‘वंशकुसुमा’च्या पानापानांतून प्रकटणार आहे.

बेळगाव येथे ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासमोर अडचणींचे डोंगर असले संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार बेळगावकरांनी केला आहे. अपेक्षित निधी जमा झाला नसल्याने संमेलन साधेपणाने करायचे, असा निर्णय झाला आहे. मात्र बेळगावकर कवयित्री इंदिरा संत यांच्या स्मृत्यर्थ नाट्यसंमेलनासाठी ‘वंशकुसुम’ या शीर्षकाची स्मरणिका प्रकाशित होणार आहे. ‘वंशकुसुम’ हे इंदिरा संत यांच्या लोकप्रिय काव्यसंग्रहाचे नाव आहे. या शीर्षकाला परंपरेने सुंदर अर्थांचे वरदान दिले आहे, अशी माहिती संपादिका मेधा मराठे यांनी दिली.

शीर्षकाचे औचित्य
स्मरणिकेचे ‘वंशकुसुम’ हे नाव औचित्यपूर्ण आहे. वंश म्हणजे बांबू, बेळगाव हे पूर्वापारपासून बांबूचे क्षेत्र आहे. आजही घरोघरी एक तरी वंशवृक्ष दिसतो. मात्र हे झाड कित्येक वर्षांनी एकदाच फुलते. बांबूचा बहर हे प्रेक्षणीय दृश्य असते. ते दुर्मिळ पण प्रेक्षणीय असते. बेळगावचे संमेलनही तब्बल ५८ वर्षांनंतर होत आहे. बेळगावकरांसाठी ही दुर्मिळ पण हवीहवीशी घटना आहे. हे दृश्य बेळगावकर कायम स्मरणात ठेवतील. हा सारा भाव व्यक्त करणारे ‘वंशकुसुम’ हे नाव त्यामुळे अन्वर्थक वाटले, असे मराठे यांनी सांगितले.

सांस्कृतिक वातावरण
- सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत संस्था, व्यक्ती व उपक्रमांची दखल
- इंदिरा संत, कृ. ब. निकुंब, शंकर रामाणी, अनंत मनोहर, माधुरी शानबाग अशा बेळगावकर साहित्यिकांचे कर्तृत्व.
- ग्रिप्स रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमीवरील विशेष लेख

इतिहास, परंपरा दर्शन
- मराठी रंगभूमीचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल हे मूळचे बेळगावकर, त्यांच्या या कर्तृत्वाविषयीचे लेख.
- बालगंधर्वांच्या नाटकांची विलक्षण लोकप्रियता, बेळगाव, हुबळी, धारवाड, गदग या ठिकाणी प्रयोगांसाठी होणारी गर्दी, वातावरण यांच्या आठवणी.

प्रकाश योजनेवर ‘प्रकाश’
रंगभूमीसाठी प्रकाशयोजना हा महत्त्वाचा घटक असतो. प्रसिद्ध प्रकाशयोजनाकार प्रदीप वैद्य यांनी ‘वंशकुसुम’मध्ये प्रकाशयोजनेविषयी सुदीर्घ विवेचनात्मक लेखन केले आहे.