आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: 89 व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस - Divya Marathi
ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे- पिंपरी-चिंचवड येथे होणा-या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे. सबनीस यांना 1033 पैकी 485 मते मिळाली तर विठ्ठल वाघ यांना 373 मते मिळाली. अखेर सबनीसांनी वाघ यांचा 112 मतांनी पराभव केला. निवडणुकीच्या रिंगणात विठ्ठल वाघ, अरुण जाखडे, डॉ. श्रीपाल सबनीस, शरणकुमार लिंबाळे, श्रीनिवास वारुंजीकर आदी पाच उमेदवार उतरले होते. यापैकी वाघ, जाखडे व सबनीस यांची नावे सुरुवातीपासूनच आघाडीवर होती. मात्र अखेर सबनीस यांनी संमेलनाध्यक्षपदी बाजी मारली.
सेक्युलॅरिझम, प्रबोधन, आंबेडकरवाद यासह विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करीत आपल्यातील संवादसंघर्षवादी भूमिकेचे वेळोवेळी दर्शन घडविणारे डॉ. सबनीस हे समतोल वृत्तीचे साहित्यिक मानले जातात.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यपदासाठी एकूण 1033 मतदारांनी मतदान केले होते. साहित्य महामंडळाच्या इतिहासात आजवरचे हे विक्रमी मतदान होते. शेवटच्या टप्प्यात एकगठ्ठा मतदान वाढल्याने जवळपास 95 टक्के मतदान झाले होते. नागपूर, मुंबई, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा येथून अखेरच्या दिवशीच पत्रिकांचे गठ्ठे निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोचले होते.
सबनीस यांना मराठवाडा साहित्य परिषदेने पाठिंबा दिला होता. तसेच वेगवेगळ्या राज्यांतील मतेही त्यांनी मिळवली होती. विदर्भातील निम्मी मते वाघ यांना मिळाली. तर निम्मे मतदार जाखडे यांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील बहुतांश मते जाखडे यांना मिळाली. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची मते सर्वांना विभागून पडली आहेत. संयोजन समितीची एकगठ्ठा मते यंदा सबनीस यांना मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
बातम्या आणखी आहेत...