आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनातील बड्या प्रकाशकांनी केले ग्रंथप्रदर्शन हायजॅक, आठ स्‍टॉल लाटल्‍याचा आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा तुकारामनगरी, पिंपरी-चिंचवड, पुणे - साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने वाचनसंस्कृतीचा प्रसार होतो, असे सांगणाऱ्या प्रकाशकांच्या 'बड्या गटा'ने पिंपरीच्या संमेलनात ग्रंथप्रदर्शन हायजॅक केल्याची भावना छोट्या प्रकाशकांच्या मनात खदखदत आहे.
ग्रंथप्रदर्शनातील ३५० गाळ्यांपैकी तब्बल ८६ गाळे अवघ्या प्रकाशकांनी गिळंकृत केल्याचे दिसते. त्यामुळे छोट्या प्रकाशकांना 'स्टॉल संपले' अशी नकारघंटा ऐकावी लागली. गेल्या वर्षी घुमान येथे साहित्य संमेलन झाले. तेव्हा पंजाबमध्ये मराठी पुस्तके विकली जाणार नाहीत, असे सांगत बहुसंख्य प्रकाशकांनी बहिष्कार घातला होता. आता गेल्या वर्षीची कसर भरून काढण्याचा चंग प्रकाशकांच्या बड्या गटाने केल्याचे दिसते. त्यासाठीच संमेलनाच्या आयोजनात प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांचे प्रतिनिधी घ्यावेत असा आग्रह धरून तो मान्य करून घेतला. त्यानुसार प्रकाशकांचे प्रतिनिधी म्हणून अनिल कुलकर्णी आणि ग्रंथविक्रेत्यांचे प्रतिनिधी म्हणून रमेश राठीवडेकर यांना सहभागी केले गेले.
संयोजन समिती, साहित्य महामंडळ यांच्यासह चर्चा करून या प्रतिनिधींनी ग्रंथप्रदर्शनासाठी अधिक सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार अधिक जागा, दोन स्टॉलमधील अंतर वाढवणे, कार्पेट टाकलेले मार्ग अादी सुविधा मंजूर करण्यात आल्या. सोबतच मोजक्या बड्या प्रकाशकांनी जास्तीत जास्त स्टॉल्स स्वत:च्या पदरात पाडून घेतले. अधिकतर चार स्टॉल, ही अट काढून एका संस्थेने तर १६ स्टॉल मिळवले आहेत. याच पद्धतीने अन्य बड्या प्रकाशकांनी प्रत्येकी स्टॉल्स मिळवले. त्यामुळे एकुण ८६ स्टॉल्स फक्त आठ प्रकाशकांच्या ताब्यात आहेत. परिणामी अनेक छोट्या प्रकाशकांना स्टॉल संपले, या शब्दांत नकारघंटा ऐकवण्यात आली. त्यामुळे छोटे प्रकाशक नाराज आहेत.
चारचे केले आठ
छोट्या प्रकाशकांची नाराजी तीव्रपणे यानिमित्ताने व्यक्त झाली. नाव सांगण्याच्या अटीवर काही प्रकाशक म्हणाले, 'नाव फक्त वाचनसंस्कृतीचे, पण प्रत्यक्षात या दोन प्रतिनिधींनी चारऐवजी आठ स्टॉल करून घेतले. त्याऐवजी अधिकाधिक चार स्टॉलची मूळ अट कायम ठेवली असती तर लहान शहरांतील किमान २० छोटे प्रकाशक ग्रंथप्रदर्शनात सहभागी होऊ शकले असते.'
हे आहेत ८६ स्टॉल्सधारक
डायमंड प्रकाशन, साकेत, अक्षरधारा (१६ स्टॉल्स), राजहंस प्रकाशन, ज्ञानगंगा, शुभम, बुकगंगा, सरस्वती आणि मेहता पब्लिशिंग हाऊस. यापैकी अक्षरधारा, ज्ञानगंगा, शुभम हे ग्रंथविक्री आणि प्रदर्शनांच्या क्षेत्रात अधिक कार्यरत आहेत.
- सिंगल स्टॉलवाल्या प्रकाशकांवर अन्याय
- छोट्या प्रकाशकांना स्टॉलसाठी आयोजकांकडून ऐकावी लागली नकारघंटा
- गेल्या वर्षीचा 'तोटा' भरून काढण्यासाठी प्रकाशक सरसावले.