आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan In Ghuman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आलात तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याशिवाय होईल संमेलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - घुमान येथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनावर प्रकाशकांनी बहिष्कार टाकला आहे, तरीही मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न जरूर करावा. मात्र, मार्ग न निघाल्यास साहित्य महामंडळाने प्रकाशकांच्या बाबतीत ‘आलात तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याशिवाय’ अशी भूमिका घ्यावी, असे परखड मत माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडले.

‘बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय केवळ आर्थिक कारणांमुळे आहे. त्याची पर्वा करण्याचे कारण नाही,’ असे मतही जाधव यांनी मांडले.

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द.भि. कुलकर्णी म्हणाले, ‘घुमानला मराठी लाेक कमी असल्याने तिथे ग्रंथविक्री होणार नाही. प्रकाशकांचे नुकसान होईल, हे वास्तव आहे. त्यामुळे प्रकाशकांनी ‘प्रकाशक’ म्हणून नव्हे तर मराठी साहित्यप्रेमी या भूमिकेतून संमेलनास जावे. त्यातून त्यांचे मराठीचे, संतांविषयीचे, संमेलनाविषयीचे प्रेम व्यक्त होईल.’

मध्यम मार्ग शोधावा : बनहट्टी
राजेंद्र बनहट्टी हे १९८८ ते ९१ या काळात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी महामंडळ आणि प्रकाशक या दोन्ही घटकांनी एकत्रित यावे आणि मध्यममार्ग शोधावा, असे मत मांडले. ‘सुदूर पंजाबमध्ये मराठी माणसे नाहीत. मग महाराष्ट्रातून मराठी पुस्तके नेऊन ती घेणार कोण, वाहतुकीचा खर्च कसा परवडणार, ही प्रकाशकांची तक्रार योग्य आहे. पण एखाद्या वर्षी ‘व्यवसाया’चा विचार जरा बाजूला सारून प्रकाशकांनीही काही पावले पुढे टाकायला हरकत नाही,’ अस सल्लाही त्यांनी दिला.

सामोपचाराने तोडगा काढा : कोत्तापल्ले
‘संमेलन हे मराठी ग्रंथविक्रीचे मोठे स्थळ असते, हे सिद्ध झाले आहे. प्रकाशक हा ग्रंथव्यवहारातला सर्वात महत्त्वाचा घटक असतो, हे लक्षात घेऊन महामंडळाने सामोपचाराने मार्ग निघतो का, याचा विचार करावा.- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,
माजी संमेलनाध्यक्ष

प्रकाशकांची भूमिका आडमुठी : माधवी वैद्य
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या,‘प्रकाशकांनी महामंडळावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. उलट त्यांचीच भूमिका आडमुठेपणाची आहे. महामंडळ व संयोजक प्रकाशकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. घुमानला आम्ही सर्वात कमी म्हणजे फक्त ११०० रुपये भाडे घेऊन प्रकाशकांना गाळे दिले आहेत. तसेच फक्त १५०० रुपयांत दोन वेळ जेवण व रेल्वे प्रवासाची सोय दिली. शिवाय पुस्तकांसाठी स्वतंत्र बोगीची व्यवस्था केली आहे.’

एकी दाखवण्यासाठीच बहिष्काराचा निर्णय
संमेलन आयोजकांकडून प्रकाशकांमध्ये फूट पाडण्याचे उद्योग सुरू झाल्याने, आमच्यातील एकी दर्शवण्यासाठी बहिष्काराचा निर्णय घेतला. - अरुण जाखडे, कार्याध्यक्ष, मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष