आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Bhartiya Marathi Sahitya Samelan President Dr. Shipal Sabnis Comment In Pune

अध्यक्षपदाचा अपमान सहन करणार नाही; संमेलनाध्यक्ष सबनीस यांची स्पष्टोक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘मी शेतकरी कुटुंबातला, खेड्यातला माणूस आहे. संवादी भूमिकेवर माझा भर आहे, पण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे ११ कोटी मराठी भाषकांचे प्रातिनिधिक सन्मानपद आहे. त्या पदाचा अपमान मी सहन करणार नाही. खोटी विनम्रता माझ्यापाशी नाही आणि मी लेचापेचा नाही’, अशी स्पष्टोक्ती ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी केली.

मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेल्या डॉ.सबनीस यांची नुकतीच संमेलनाध्यक्षपदी निवड झाली.प्रथेप्रमाणे नव्या अध्यक्षांचा पहिला सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सबनीस बोलत होते. मसापचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

अध्यक्षपद निवडणुकीची प्रक्रिया लोकशाही पद्धतीने झाली तरीही त्याबाबत अन्य उमेदवारांनी निर्माण केलेल्या संशयाचा व आरोपांचा सबनीस यांनी ठाम इन्कार केला. ‘मी सांस्कृतिक लोकशाही मानणारा माणूस आहे. माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. मी गुन्हेगार नाही, बदमाशी केली नाही, भ्रष्टाचार केला नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताच्या प्रवाहाचा मी डोळस भक्त आहे, उपासक आहे. या संचिताचा सारांश म्हणजे संमेलनाचे अध्यक्षपद, असे मी मानतो. ११ कोटी मराठी जनतेने माझा हा प्रातिनिधिक सन्मान केला आहे, असे मी समजतो. त्या पदाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे’, असे सबनीस म्हणाले.
संघर्षापेक्षा संवादी भूमिका महत्त्वाची
‘कुठल्याही घटकाबाबत संघर्षापेक्षा संवादाची भूमिका मला महत्त्वाची वाटते. जे चांगले आहे, त्याचा गौरव आणि जे प्रतिकूल आहे, वाईट आहे, त्यासाठी विरोधी भूमिका घेण्यात गैर काहीच नाही. पण समन्वयवादी विचार सगळ्याच्या मुळाशी असावा’, असे मतही डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले.
पुरस्कार पणाला लावणार नाही : डॉ. मोरे
संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘सबनीस हे संघर्ष आणि संवादाच्या नेमक्या जागा अचूक जाणतात. मार्क्सवाद आणि चळवळीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. ते साक्षेपी, सामाजिक बांधिलकी मानणारे, तरीही आक्रमक असे समीक्षक आहेत. त्यांच्या निवडीचे मी स्वागत करतो. त्यांनी माझ्यासाठी गेल्या वर्षी निवडणुकीतून माघार घेऊन मला पाठिंबा जाहीर केला होता.’ पुरस्कार वापसीविषयी बाेलताना डाॅ. माेरे म्हणाले ‘विशिष्ट भूमिका घेऊन, संशोधनानंतर, अभ्यासातून जे प्रकट झाले ते लेखन केले. त्याला मिळालेले पुरस्कार मी पणाला लावणार नाही.’