आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनात रसिक चाखणार नानाविध पदार्थांची चव, भोगीच्या भाजीचाही बेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शुक्रवार पासून सुरु होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रुचकर साहित्य चर्चेसोबत नानाविध खाद्यपदार्थांचे नमुने चोखंदळ रसिकांना चाखता येणार आहेत. संमेलनात तीनही दिवस स्पेशल मेन्यू बनवण्यात येत असल्याची माहिती पुण्यातील प्रसिद्ध ‘सरपोतदार्स केटरर्स’चे किशोर सरपोतदार यांनी येथे दिली.

संमेलनातील कार्यक्रमांची विविधता भोजन, न्याहरीतही जपली आहे, असे सांगून सरपोतदार म्हणाले,“महाराष्ट्रीयन भोजनाची सर्व वैशिष्ट्ये भोजनात समाविष्ट आहेतच, पण विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर, राजस्थानी, गुजराती आणि दाक्षिणात्य पदार्थांचाही आस्वाद मंडळींना घेता येणार आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या चवींचेही संमेलन येथे अनुभवता येणार आहे,”

जेवणाचा थाट असा असेल
उकडीचेमोदक, गुळाची पोळी, गरम मसाला दूध जिलेबी, नागपुरी पुरणपोळी, गोळा भात, चिंचेचे सार, सांडग्याची भाजी, राजस्थानी मालपोवा, तिळाच्या वड्या, जळगावी भाकरी. आदी खाद्यपदार्थ खास त्या त्या प्रांतातील आचारी बनवतील. संमेलनात सर्व दिवशी सकाळचा नाष्टा, चहा, दुपारी पक्वान्नासह भोजन, चार वाजता चहा- बिस्किटे आणि रात्री पुन्हा पक्वान्न भोजन असा थाट असेल. संमेलनस्थळी अन्यत्र २० स्वतंत्र खाद्यपदार्थ विक्रीचे गाळे असतील. नाशिकचा चिवडा, पुण्याची बाकरवडी, व्हेज पॅटिस, कयानीचा केक, बुधानी वेफर्स, कोकणी पदार्थ साहित्यिक, रसिकांसाठी तयार होतील.

मधुमेहींसाठी स्वतंत्र मेन्यू
संमेलनाला येणाऱ्या मधुमेही तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी यंदा दररोज पालेभाजी आणि भाकरीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना कमी उष्मांकाचे जेवण, हर्बल चहा, बिनसाखरेच्या चहाची सोय करण्यात आली आहे. दररोज उपवासाचेही काही पदार्थ असतील.

फूड पॅकेटमध्येही वैविध्यता जपणार
दिंडीतसहभागी होणाऱ्यांना फूड पॅकेट्स दिली जाणार आहेत. त्यात तिखटमिठच्या पुऱ्या, लोणचे, चटणी, केळी, वाटी केक, सोनपापडी, तिळाचा लाडू, पाण्याची बाटली यांचा समावेश असेल . मकरसंक्रातीनिमित्त पराठा, ज्वारी-बाजरीची भाकरी, पावटा, वांगी, गाजर, हरभरा आदी विविध मिक्स भाज्यांची भोगीची भाजी, नाष्ट्याला कोल्हापुरी मिसळ, तर्री पोहे, खमंग काकडी, बटाटा डोसा भाजीचा बेत ठरवण्यात आला आहे.

फौजदारी डाळ, भाकरी
दर्याबाचे लाडू, फौजदारी डाळ, भरलेली मिरची वडा, कळणाची भाकरी असा जळगावी मेन्यू त्याच बरोबर गट्टा पुलाव, गुजराती उंधियो, खिचडी पापड असा गुजराती-राजस्थानी मेन्यू असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...