आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Parties Agitation Against Shrikar Pardeshi Transfere

श्रीकर परदेशींच्या बदलीचा सर्व स्तरांतून निषेध,राष्‍ट्रवादी- काँग्रेस वगळता सर्वपक्षीयांचे आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अनधिकृत बांधकामाविरोधात ठोस भूमिका घेऊन राजकारणी व बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडणारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या मुदतपूर्व बदलीचा सर्व स्तरांतून शनिवारी निषेध व्यक्त करण्यात आला. राष्‍ट्रवादी व काँग्रेस वगळता सर्वपक्षीय संघटना, स्वयंसेवी संघटना यांनी पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. परदेशी यांची बदली रद्द करावी अन्यथा आंदोलन, रास्ता रोको व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.
डॉ.श्रीकर परदेशी यांची पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तपदाची केवळ 18 महिन्यांची कारकीर्द झाली असताना त्यांची मुदतपूर्व बदली करण्याचे कारस्थान राष्‍ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून सुरू होते. या विरोधात भाजप, शिवसेना, मनसे, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष व सामाजिक संघटना यांनी आवाज उठवला होता. मात्र, तरीही परदेशी यांची पुण्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क नोंदणी महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली. परदेशी यांनी अवैध बांधकामांवर कारवाई, नियमबाह्य कामांना केलेला विरोध, कामचुकार कर्मचारी व अधिका-यांवर कारवाई केली होती. त्यांनी केलेल्या अनेक कौतुकास्पद कामांमुळे अनेक नागरिक त्यांच्या पाठीशी उभे असल्याची प्रतिक्रिया एका व्यक्तीने या वेळी बोलताना दिली.
अण्णा करणार विरोध
आम आदमी पक्षाचे समन्वयक मारुती भापकर म्हणाले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परदेशी यांची बदली करू नये, असे यापूर्वी सांगितले होते. मात्र, तरीही परदेशींची बदली झाल्याने येत्या मंगळवारी हजारे पिंपरी-चिंचवडमध्ये बदलीचा विरोध करण्यासाठी येणार आहेत.