आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Scholar Engaged In Marathi Kirtan, Got Doctorate In Kirtan

मराठमोळ्या कीर्तनरंगात रंगली अमेरिकन विदुषी, कीर्तनात डॉक्टरेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठमोळी नऊवारी साडी, नाकातील नथ, गळ्यातील फुलांचे हार, बुक्का आणि कुंकवाचा टिळा आणि गळ्यातील टाळांचा निनाद करत मराठी, संस्कृतमध्ये निरूपण... या वर्णनाला छेद देणारी व्यक्ती म्हणजे डॉ. अना शुल्ट्झ हे नाव. एरवी गावोगावच्या मंदिरांमधून हे दृश्य आपल्या परिचयाचे; पण पुण्यातल्या सत्कार समारंभात डॉ. अना यांनी सादर केलेले कीर्तन अनोखे ठरले.
अना या मूळच्या अमेरिकन. न्यूयॉर्कच्या रहिवासी. सुरुवातीपासूनच त्यांना ‘भारतीय संस्कृती’ या विषयाची ओढ होती. 'या अभ्यासाच्या अनुषंगाने वाचन करताना मला कीर्तन परंपरेची माहिती मिळाली आणि माझी उत्सुकता जागी झाली. मी भारतात येऊन या परंपरेचा अभ्यास सुरू केला. भावभक्तीने ईश्वरदर्शनाला निघणारा कीर्तनात रंगलेला वारीचा सोहळा जसा मला भावला तसेच राष्ट्रपुरुषांची चरित्रे आख्यानरूपाने मांडून जनजागृतीसाठी केला जाणारा कीर्तनाचा उपयोगही मला परिणामकारक वाटला. मी सतत तीन वर्षे कीर्तन परंपरेचा अभ्यास केला. अनेक कीर्तनकारांना भेटले. ध्वनिमुद्रणे केली,' अशी माहिती डॉ. शुल्ट्झ यांनी दिली.

कीर्तनात डॉक्टरेट
चार वर्षे सतत अभ्यास, संशोधन, लेखन, सराव यातून डॉ. अना शुल्ट्झ यांनी ‘सिंगिंग अ हिंदू नेशन : मराठी डिव्होशनल परफॉर्मन्स अँड नॅशनालिझम’ या विषयावर शिकागाेतील अलिनॉय विद्यापीठात प्रबंध सादर केला आणि व्हायवासाठी कीर्तन सादर करून डॉक्टेरट मिळवली. एवढ्यावर न थांबता आता त्यांनी ज्यू कीर्तन परंपरेचा अभ्यासही सुरू केला आहे. बायबलमधील तत्त्वज्ञान हा त्यामधील आख्यानाचा विषय असतो, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपुरुषांचे संदर्भ
कीर्तनात गायन, वादन, अभिनय आणि उत्तम पाठांतर यांचाही समावेश असतो. मी कीर्तनासाठी विषय म्हणून राष्ट्रपुरुषांची चरित्रे अथवा पौराणिक संदर्भ निवडते. त्यानुरूप पद्य, कथा, इतर माहिती यांचे संकलन करते. त्यानंतर पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण करते.
डॉ. अना शुल्ट्झ