पुणे- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा हे आज पुणे दौ-यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुणे भाजपने ‘विराट विजय संकल्प मेळावा’ आयोजित केलेला आहे. यावेळी अमित शहा हे महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याचा नारा देणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची सध्या तयारी सुरु असून, अमित शहांचे स्वागतही खास पुणेरी पद्धतीने करण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा मानस आहे.
नुकत्याच केंद्रात झालेल्या सत्ता परिवर्तनामधे
नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काँग्रेसमुक्त भारताचा नारा उत्तर प्रदेशमध्ये संपूर्णपणे खरा ठरवून यूपीत सत्ता परिवर्तनात सिंहाचा वाटा उचलणारे अमित शहा हे पुणे येथे येत आहेत. त्यावेळी पुणे भाजपने ‘विराट विजय संकल्प मेळावा’ आयोजित केलेला असून यामध्ये महाराष्ट्रदेखील काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याचा नारा शहा देणार आहेत. पुणे शहरातील बूथ यंत्रणेपर्यंत या निमित्ताने कार्यकर्त्यांची योजना केलेली असून प्रत्येक बूथ वरून कार्यकर्त्यांना या विजय संकल्प मेळाव्यात आणण्यात येणार आहे.
पुणे भाजप शहराध्यक्ष व खासदार अनिल शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच प्रमुख शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. लोकसभेत पुण्यातील आठही विधानसभेत भाजपने आघाडी घेतली होती त्याचीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकांमध्ये करायची आहे. पुणे देखील काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याचा संकल्प
आपल्याला करावयाचा आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत होणारा विजय संकल्प मेळावा हा त्यादृष्टीने पहिले आश्वासक पाउल असेल असे सांगत कार्यकर्त्यांना या मेळाव्याची जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले आहे.
या निमित्ताने सर्व विधानसभा मतदारसंघाचे छोटे मेळावे घेण्यात आले असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मेळाव्यात येतील, कार्यकर्ते टू व्हीलर रॅली, पदयात्रा, सायकल फेरी अशा पद्धतीने गणेश कला क्रीडा मंच येथे येतील. मुख्यद्वारावरती अमित शहांचे जंगी स्वागत करून त्यांना कमीत कमीतकमी 10 हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या संकल्पाचे समर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा यांना ऐकण्यासाठी पुणेकर उत्सुक आहेत त्यामुळे विजय संकल्प मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.