आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - ‘कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातानंतर मी मृत्युशय्येवर होतो. मी गेलो, असेही जाहीर झाले, पण असंख्य चाहत्यांच्या प्रार्थना आणि प्रेमाने जणू मला पुन्हा जीवदान दिले. अशा चाहत्यांचे ऋण घेऊन जगण्यातच मला अभिमान वाटतो’, असे भावपूर्ण उद्गार महानायक अमिताभ बच्चन यांनी सोमवारी काढले. आज जो अमिताभ तुमच्यासमोर दिसतो, तो केवळ तुमच्या सदिच्छांमुळे. असेही ते म्हणाले.
बच्चन यांना सोमवारी पुणे पंडित हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यानंतर खचाखच भरलेल्या सभागृहाशी बिग बींनी मनमोकळा संवाद साधला. व्यासपीठावर बच्चन यांचे आगमन होताच चाहत्यांनी उभे राहून, टाळ्यांचा कडकडाट करत आणि घोषणांनी त्यांचे स्वागत केले. बच्चन यांनीही मान झुकवून, हात उंचावत या स्वागताचा स्वीकार केला. आपल्या मनोगतात त्यांनी बालपणापासूनचे वातावरण, आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार आणि साहित्यिक-शैक्षणिक भवतालाचा उल्लेख केला. ‘माझे वडील गरीब कुटुंबातले तर आई श्रीमंत कुटुंबातली होती. पण त्यांनी प्रेमविवाह केला आणि आम्हाला उत्तम संस्कार दिले. आजही आई-वडील हेच माझे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनीच मला जगण्याचे, संघर्षाचे आत्मबल दिले. माझी ओळख वडिलांच्या नावाने नसावी, माझ्या कामाने निर्माण व्हावी, एवढेच लक्ष्य मी ठेवले आणि अभिषेकच्या बाबतही मी तेच तत्त्व आचरले. माझा मुलगा म्हणून त्याला लाभ दिले नाहीत. खास प्रयत्नही केले नाहीत. आपल्यामध्ये जर क्षमता असेल आणि प्रामाणिकपणे मेहनतीची तयारी असेल, तर तुमचे स्थान तुम्हाला मिळतेच’, असा मंत्रही अमिताभ यांनी दिला.
माझे यश टीमचे
मी साधा माणूस आहे. मला उत्तम लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्माते भेटले. त्यांनीच मला चांगल्या भूमिका दिल्या. मी परिश्रम घेतले. पण त्यांच्यामुळे यशस्वी झालो, असे बच्च्न यांनी मान्य केले.
तर माझे नाव इन्किलाब असते..
मी आईच्या पोटात असताना, आईने 1942 च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळे माझे नाव इन्किलाब ठेवावे, असे काहींचे मत होते. पण नंतर ज्येष्ठ कवी, लेखक सुमित्रानंदन पंत यांनीच आम्हा भावंडांचे नामकरण केले, असा किस्सा अमिताभ यांनी सांगितला.
चित्रपट ही समांतर संस्कृती
भारतीय चित्रपट आता शताब्दी पार करत आहे. आजच्या तरुणांना चित्रपटात खूप रुची आहे, हे देशासाठी चांगले आहे, की नाही, हे मला माहिती नाही. पण चित्रपट ही एक समांतर संस्कृती आहे, हे मान्य करावे लागेल. अर्थात सर्वाधिक प्राधान्य आपल्या देशाच्या संस्कृतीचे आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे, असा उल्लेखही अमिताभ यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.