आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदवनातील प्रयोग म्हणजे आदर्श ग्रामजीवनाचे मॉडेल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे हे युगधर्म निर्माण करणारे युगपुरुष होते. सामान्यांमधून त्यांनी असामान्य कार्य उभे केले. त्यांच्या या युगधर्माचा वारसा आमटे कुटुंबीय पुढे नेते आहेत. आनंदवनातील प्रत्येक आव्हान ही त्यांनी नव्या प्रयोगाची संधी मानली आणि त्यावर मात केली. हे सारे प्रयोग म्हणजे गांधीजींच्या मनातल्या आदर्श ग्रामजीवनाची मॉडेल्स आहेत,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काढले.

डॉ. विकास आमटे लिखित ‘आनंदवन-प्रयोगवन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात झाले. ‘समकालीन प्रकाशन’चे आनंद अवधानी, अभिनेते विक्रम गोखले, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे या वेळी उपस्थित होते.

‘हे पुस्तक म्हणजे डॉ. विकास यांचे आत्मचरित्र नाही. आनंदवनातल्या रिअल हीरोंची ही वास्तव कहाणी आहे. बाबा आमटे यांच्या कार्याचा वारसा आमटे यांच्या तीन पिढ्यांनी समर्थपणे जपला आहे.

अनेक सामान्य माणसांमधील पौरुष जागे करून त्यांच्या हातून असामान्य कृती आमटे यांनी घडवल्या आहेत. हा प्रवास थक्क करणारा आहे,’ असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. ‘राज्यापुढे २४ हजार गावांतल्या दुष्काळाचे मोठे आव्हान उभे आहे. ५ हजार गावे जलयुक्त करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी आनंदवनातल्या प्रयोगांचे मॉडेल एकत्रित स्वरूपात वापरता येईल. तसे प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विक्रम गोखले म्हणाले,‘बाबांसारख्या महामानवाने थाटलेला हा संसार डॉ. विकास या ‘रामा’ने ‘लक्ष्मणा’ची कृती करत पुढे नेला आहे. हे पुस्तक वाचून मानवता, दया, करुणा, सेवा यांची महानता समजेल.

ग्रामीण महाराष्ट्राला आनंदवनातील प्रयोगांचा ‘मॉडेल’ म्हणून उपयोग होईल’. डॉ. लहाने यांनी,‘ महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेले स्वयंपूर्ण खेडे आनंदवनात साकारले आहे,’ असे मत मांडले.

(फोटो : डॉ. विकास आमटे लिखित ‘आनंदवन प्रयोगवन’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात झाले. यावेळी अभिनेते विक्रम गोखले, डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.)