आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार यादीतील घोळ: पुण्यात नागरिकांच्या तक्रारी, अनिल शिरोळेंचे उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यात गुरुवारी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी हजारो मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याच्या निषेधार्थ भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी आज सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. काल रात्री मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारून जिल्हाधिकारी सौरभ राव यांना घेराव घातला होता. त्यावर राव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत माहिती सादर करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, काही उमेदवारांनी फेरमतदान किंवा स्वतंत्र मतदान घेण्याची मागणी केली होती. ती फेटाळून लावण्यात आल्याने भाजपचे अनिल शिरोळे यांनी पुण्यातील कौन्सिल हॉलसमोर सकाळपासून उपोषण सुरु केले आहे.
आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष वारे यांनीही लोकांना मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांचा लोकशाहीचा हक्क काढून घेण्यासारखे असल्याचे सांगत फेरमतदान किंवा वंचित राहिलेल्याचे मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. जर तसे झाले नाही तर आपण सत्याग्रह करू असेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी वारे यांनी रविवारी मतदारांचा मेळावा आयोजित केला आहे. मनसेचे दीपक पायगुडे यांनीही शिरोळे व वारे यांच्या सूरात सूर मिसळवला आहे.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नागरिकांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत लेखी तक्रार नोंदवावीत असे सांगितले होते. मात्र, तक्रार देण्याची वेळ वाढवावी, अशी राजकीय व सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे. त्याविरोधात शेकडो लोक कौन्सिल हॉलसमोर बसून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, अनेक मतदार अजूनही राव यांच्याकडे लेखी तक्रारी घेऊन येत आहेत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात त्या स्वीकारल्या जात नाहीत. त्याची वेळ 11 पर्यंत असल्याचे कर्मचा-यांकडून मतदारांना सांगितले जात आहे. त्यामुळे तेथे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व मतदार यांच्यात खटके उडत आहेत.
पुण्यातील कोथरूड, कॅन्टोंमेंट आणि पेठांच्या परिसरात अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब असल्याची तक्रारी काल दुपारी 12 वाजल्यापासून येऊ लागल्या होत्या. सुमारे लाखभर मतदारांची नावे नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. बहुतेक लोक वर्षानुवर्षे त्याच पत्त्यावर राहत असताना त्यांची नावे कशी काय गायब होतात? असा प्रश्न विचारत यामागे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. नवमतदारांची नावे येतात मग जुन्या लोकांची नावे का वगळली गेली असा प्रश्न मतदारांनी जिल्हाधिकारी राव यांना केला होता. लोकांना मतदानापासून व लोकशाहीतील त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले आहे. त्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी अनिल शिरोळे यांनी केली आहे. त्यांच्यासोबत विनिता देशमुख, सुभाष वारे, इतर संघटनांचे लोक व मतदार उपोषणास बसले आहेत.
पुढे वाचा व पाहा, शिरोळेंनी काय केली आहे मागणी व उपोषणाचे फोटो...