आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजून किती ‘दाभोलकरां’ची सरकार वाट पाहणार, पुण्‍यात भर पावसात 'अंनिस'चे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - “डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला चार वर्षे झाली तरी त्यांचे मारेकरी सापडत नाहीत. संथगतीने तपास चालू आहे. आणखी किती ‘दाभोलकर’ होण्याची वाट सरकार पाहणार आहे,’ असा उदविग्न प्रश्न अंनिसच्या वतीने रविवारी पुण्यात भरपावसात काढलेल्या पदयात्रेत उपस्थित करण्यात आला.  
 
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी देह ठेवलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला रविवारी (२० ऑगस्ट) चार वर्षे पूर्ण झाली. मात्र अद्याप त्यांच्या खुन्यांच्या तपास पोलिस यंत्रणांना लावता आलेला नाही. याच्या निषेधार्थ पुण्यात ‘जवाब दो’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. दाभोलकरांना ज्या महर्षी शिंदे पुलावर गोळ्या झाडण्यात आल्या त्या ठिकाणाहून पदयात्रेची सुरुवात झाली. पर्वती पायथ्याला असलेल्या साने गुरुजी स्मारकात पदयात्रेची सांगता झाली. या ठिकाणी पदयात्रेचे रूपांतर सभेत झाले. जोरदार पाऊस असूनही अनेकांनी पदयात्रेत सहभाग घेतला.  
 
‘आम्ही सारे दाभोलकर’, ‘जवाब दो’, ‘माणूस मारता येतो, विचार नाही’, ‘आपली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे’, ‘अहिंसा परमो धर्म’ अशा घोषणांचे फलक पदयात्रेतल्या नागरिकांच्या हातात होते. ‘जवाब दो’ या हॅशटॅगचा वापरही सोशल मीडियात सुरू करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दाभोलकर यांच्या पत्नी शैला, कन्या मुक्ता, मुलगा हमीद तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, अभिनेते अमोल पालेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, मिलिंद देशमुख यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होते. पदयात्रेच्या सांगताप्रसंगी ‘हिंसा के खिलाफ’ हा कार्यक्रम झाला. या वेळी ज्येष्ठ चित्रपट कथालेखक जावेद अख्तर, पत्रकार राजदीप सरदेसाई आदींनी मार्गदर्शन केले.

देशाला वेळीच वाचवा : अख्तर
‘जगात जिथे जिथे धर्माचे प्राबल्य आहे, अशा प्रत्येक ठिकाणी अन्याय, हिंसा, अत्याचार होत आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेमुळे या सर्वांपासून आपला देश वेगळा असल्याचे सांगितले जाते. हीच ओळख पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या विषवल्लीचा प्रसार समाजात एकदा का सुरू झाला की त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. त्यामुळे स्वतःला आणि देशाला वेळीच वाचवूयात. प्रश्न विचारण्याची मुभा जिथे असू शकत नाही तो देश, ते वातावरण निकोप कसे म्हणता येईल?’ असे जावेद अख्तर म्हणाले.

सरकारला हादरवून साेडा : पालेकर ‘सध्याची असुरक्षितता, मुस्कटदाबी पाहून मन उद्विग्न होते. पण या उद्विग्नतेने निराश न होता शासन आणि व्यवस्थेला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची मोहीम घेत सरकारला हादरवून सोडले पाहिजे,’ असे आवाहन अभिनेते अमोल पालेकर यांनी केले. “श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव यांच्यावर कोणी कोणताही पत्रकार बोलत नाही. या लोकांना राजनैतिक पाठबळदेखील लाभते. पत्रकारिता हा ‘टीआरपी’चा व्यवसाय झाला आहे,’ अशी टीका सरदेसाई यांनी केली.  
 
बातम्या आणखी आहेत...