आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंनिसच्या आंदोलनाला सनातनचे मोर्चाने उत्तर, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा अजूनही शोध नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्षे झाली, पण त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. तपासयंत्रणांचे गांभीर्यही हरवले आहे, याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवारी (२० ऑगस्ट) आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे ‘सनातन संस्थे’नेही अन्य संस्था आमची नाहक बदनामी करत असल्याचे सांगत मोर्चा काढून अंनिसला उत्तर दिले. त्यामुळे शनिवारी सकाळी पुण्यातले वातावरण ढवळून निघाले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला शनिवारी तीन वर्षे झाली. या पार्श्वभूमीवर त्यांचे स्मरण, ग्रंथ प्रकाशन आदी कार्यक्रम अंनिसच्या वतीने आयोजिण्यात आले होते. त्याची सुरुवात ओंकारेश्वर मंदिरापासून मोर्चा काढून करण्यात आली. तीन वर्षे उलटूनही तपास संथ गतीने सुरू आहे, अशी भावना डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली. अंनिसच्या मोर्च्यात दाभोलकर कुटुंबीयांसह अंनिसचे शेकडो कार्यकर्ते, तसेच भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, बाबा आढाव, अतुल पेठे, संध्या गोखले आदी सहभागी होते.

सरकारला मारेकरी शोधायचेच नाहीत : अॅड. प्रकाश आंबेडकर
हत्येचातपास करणारी यंत्रणाच भयभीत असून, सरकारला दाभोलकरांचे मारेकरी शोधायचेच नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी मोर्च्याचे सभेत रूपांतर झाल्यावर केली. हत्येचा तपास हे राजकीय युद्ध बनले आहे, असे ते म्हणाले. विधानसभा, लोकसभेत दाभोलकरांच्या हत्येवर कुणी बोलत नाही, हा कावा आहे. निषेधाचा एक शब्दही कुणी काढत नाही. धर्म, जातीच्या नावावर हिंसाचार करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. संविधान मोडीत काढण्याचा हा डाव आहे, असे मत बाबा आढाव यांनी मांडले.

शैला दाभोलकर म्हणाल्या, ‘डॉक्टरांच्या हत्येने चळवळीचे कार्यकर्ते दु:खी झाले आहेत. मात्र, नव्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या रिंगण नाट्याने चळवळीला पुन्हा बळ मिळत आहे. धरणे, आंदोलने, निषेध, उपोषणे, घोषणा, लेख..यांच्या जोडीने रिंगणनाट्यासारख्या नव्या पथदर्शी उपक्रमाने चळवळ पुन्हा उभारी धरेल”.

सनातन संस्थेने बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान ते कसबा गणपती असा मोर्चा काढला. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा, डॉ. वीरेंद्र तावडे, कमलेश तिवारी यांचे समर्थन करणारे फलक हाती घेऊन साधक या मोर्च्यात सहभागी झाले होते. अंनिसच्या ‘आम्ही सारे दाभोलकर’ या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून सनातनवाल्यांनी ‘आम्ही सारे सनातन’ अशा घोषणा दिल्या. वीरेंद्र तावडेंना अटक करून ७० दिवस झाले पण एकही पुरावा पोलिसांना देता आलेला नाही. संस्थेची विनाकारण बदनामी बंद करावी, असे अभय वर्तक म्हणाले. अंनिसला देश-विदेशातून जो निधी येतो, त्याची चौकशी करावी, अशी मागणी सनातनचे अभय वर्तक यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...