आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सेवा परीक्षेची ‘ज्ञानगंगा’ मोबाइलवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तो असतो कायम व्हीलचेअरवर. पण त्याची उमेद आणि बुद्धिवैभव कुठल्याही सक्षम व्यक्तीला लाजवणारे.. स्वत:च्या अनुभव आणि पर्शिमांतून त्याने राज्य सेवा परीक्षांचा (एमपीएससी) ज्ञानकोशच सीडीरूपात आणला आहे आणि हा ज्ञानकोश त्याने आता चक्क मोबाइलवर उपलब्ध केला आहे. पुण्यातल्या अपंग साहित्य संमेलनात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनलेल्या या होतकरू तरुणाचे नाव आहे नीलेश छडवेलकर.

नीलेश मूळचा धुळे जिल्ह्यातील. पिंपळनेर गावच्या नीलेशला अवघा दीड वर्षांचा असताना पोलिओने गाठले. त्याचे कमरेपासूनचे शरीर अधू बनले. आई-वडिलांच्या प्रयत्नांनी त्याने चौथीपर्यंतचे शिक्षण घरीच पूर्ण केले. पाचवीपासून तो शाळेत जाऊ लागला. वाणिज्यची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. मग त्याच्या मनात राज्य सेवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे स्वप्न उमलू लागले. जिद्दीच्या जोरावर एसपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र पोस्टिंग दुर्गम भागात मिळाल्यास अडचणी वाढतील, ही कुटुंबीयांनी काढलेली समजूत मान्य करून त्याने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, अशी माहिती जमवण्यास सुरुवात केली. भावाने दिलेल्या संगणकाच्या मदतीने नीलेशने यशोशिखर गाठले.

बारा हजार पाने
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहितीचे संकलन करून नीलेशने ज्ञानकोशाची निर्मिती केली. ‘ज्ञानगंगा’ असे त्या माहितीच्या साठय़ाचे त्याने नामकरण केले आणि लगेच ती माहिती सीडीरूपात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली. शिवाय बीएएलएईई डॉट कॉम हे संकेतस्थळ विकसित केले. एसपीएससी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी तब्बल बारा हजार पृष्ठांची ही माहिती नीलेशने आता मोबाइलवर आणली आहे.