आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या बागेत फुलवली सफरचंद बाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लाल-गुलाबी रंगाचे, मधुर चवीचे सफरचंद हे खास काश्मीर-हिमाचल प्रदेशमधले फळ. देशात इतरत्र हे फळ औषधालाही लागवडीखाली दिसत नाही. पण नंदकुमार धुमाळ या पुणेकराने मात्र आपल्या घराच्या बागेत सफरचंदाची बाग फुलवण्याची किमया केली आहे. आजच्या घडीला त्यांच्या बागेत सफरचंदाची सुमारे ३० झाडे फळांनी डवरून आली आहेत. धुमाळ यांच्या या कामगिरीची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्ससह इंडिया बुक, युनिक बुक, गोल्डन बुकमध्येही झाली आहे.

टाटा मोटर्समध्ये काम करणार्‍या धुमाळ यांच्या घरी अगदी मोजकी जागा आहे. पण सतत वेगळे काहीतरी करायचे, या छंदातून त्यांनी घराभोवती हिरवाई फुलवली आहे. गच्चीतही त्यांनी बाग जोपासली आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना ते म्हणाले, ‘२००१ मध्ये मी घरी खाण्यासाठी चांगली सफरचंदे आणली होती. त्यांच्या बिया मी जपून ठेवल्या होत्या.
सात-आठ वर्षांपूर्वी मी त्या बिया माती व शेणखत भरून प्लास्टिकच्या पिशवीत लावल्या. सुरुवातीला पाच बिया लावल्या. थोड्याच दिवसांत त्या बियांची रोपे तरारून वर आली. मग त्या कुंडीत शिफ्ट केल्या. त्यापैकी दोन रोपे जळाली. पण उर्वरित तीन रोपे चांगली वाढली. ती दीड फूट उंच झाल्यावर जमिनीत लावली. ती वाढली आणि पाच वर्षांनंतर त्यांना प्रथम फुले लागली. पुढच्या वर्षी फळे लागली. मात्र त्यांचा आकार लहान होता. चवीलाही ती आंबट होती. पण आताच्या हंगामात लागलेली फळे आकारानेही मोठी आहेत आणि चवीलाही उत्तम आहेत. त्यानंतर सफरचंदाची आणखी झाडेही मी वाढवली. तीही आता फुलत आहेत. त्यांनीही फळे धरली आहेत. काही झाडे तर २० फूट उंच वाढली आहेत. एकेका झाडाला सुमारे ७०-८० फळे लागली आहेत. सफरचंदाचा हंगाम वर्षातून दोन वेळा असतो. त्यामुळे फळांची संख्या वाढणार यात शंकाच नाही. '

देखभालीचा परिणाम
आपल्याकडील उष्ण वातावरणात सफरचंद रुजले हेच आश्चर्य आम्हाला वाटत आहे. शिवाय मी काही फार वेगळी निगा राखली असेही नाही. मातीचा थर, शेणखत आणि नियमित पाणी एवढेच सांभाळले. प्लास्टिकची पिशवी, कुंडी आणि बागेतली जमीन अशा तिन्ही ठिकाणी सफरचंदाची रोपे छान वाढली आहेत. - नंदकुमार धुमाळ