आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरचा स्थापत्यशास्त्रीय अभ्यास पूर्णत्वास, ‘आर्किटेक्चरल स्टडीज ऑफ पंढरपूर’ लवकरच भाविकांसमाेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरचे आध्यात्मिक महत्त्व तर वादातीत आहेच, पण धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर राज्याचे नाव अधोरेखित करणाऱ्या पंढरपूरचा स्थापत्यशास्त्रीय अभ्यास अद्याप अधिकृतपणे झालेला नाही. असा अभ्यास एक संशोधन प्रकल्प म्हणून पुणेकर संशोधक वैशाली लाटकर यांनी केला असून लवकरच हा अभ्यास लोकांसमोर येणार आहे. 

‘आर्किटेक्चरल स्टडीज ऑफ पंढरपूर’ असा हा संशोधन प्रकल्प असून स्वत: कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असणाऱ्या वैशाली लाटकर गेल्या पाच वर्षांपासून पंढरपूरचा स्थापत्यशास्त्रीय अभ्यास करत आहेत. या पाच वर्षांत पंढरपूरमधील शेकडो जुन्या वास्तू, मंदिरे, मठ, फड, घाट यांचा अभ्यास त्यांनी स्थापत्यशास्त्रदृष्ट्या केला आहे. हा अभ्यास लवकरच सर्वांसमोर येणार आहे.   

या संशाेधनासंदर्भात अधिक माहिती देताना  लाटकर म्हणाल्या, ‘पंढरपूरचे धार्मिक - आध्यात्मिक महत्त्व आपल्या परिचयाचे आहे. पण या ठिकाणी यादवकाळापासूनच्या वास्तू आढळतात. कित्येक मंदिरे, मठ, वाडे, घाट, फड यांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. तो जसा लिखित स्वरूपात आढळतो त्यापेक्षाही त्या काळाचे थेट साक्षीदार म्हणजे तत्कालीन वास्तू असतात. अनेकदा वास्तुवैभव लिखित पुराव्यांपेक्षा अधिक काही बोलू शकते. वास्तू संवर्धकतज्ज्ञ या नात्याने काम करताना मी पंढरपूरच्या प्रामुख्याने स्वातंत्र्यपूर्वकाळातील वास्तूंचा विचार केला आहे. त्यात मंदिरे, मठ, फड, वाडे, घाट अशा वास्तूंचा समावेश आहे. फड ही वास्तू फक्त पंढरपूरमध्येच आढळते. पुराणवाङ्मयात येथील वास्तूंचे खूप संदर्भ आढळतात. तेथील वास्तूंमध्ये अनेक जुन्या वस्तू, हस्तलिखिते जतन केलेल्या आहेत. हे सारे आपले सांस्कृतिक वैभवाचे स्रोत आहेत. मात्र, ते कायम दुर्लक्षित राहिले आहेत. त्या वास्तूंचा अभ्यास स्थापत्याच्या अंगाने होणे गरजेचे आहे.’  

वास्तुवैभवाची जाणीव अभ्यासातून कळावी  
विकासाच्या प्रक्रियेत आपल्या ‘वारसा स्थळां’ना कसे आणि कशा प्रकारे जपले पाहिजे, टिकवले पाहिजे याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पद्धती आहेत. विकासाची प्रक्रिया न खुंटवताही आपले वास्तुवैभव आपण जतन करू शकतो. केवळ डागडुजी म्हणजे संवर्धन वा जतन नव्हे. त्यापलीकडे वास्तुवैभव जपता येते, याची जाणीव या अभ्यासातून पुढे यावी, ही अपेक्षा आहे.   
- वैशाली लाटकर, कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट
बातम्या आणखी आहेत...