आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Are Your Supposes Opposition Leaders Behave As Cheer Leaders

विरोधी पक्षांना चिअर लीडर्स समजता का?, राजनाथसिंह यांचा केंद्र सरकारला सवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काँग्रेस नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘सीडब्ल्यूजी’, कोलगेट, टू जी स्पेक्ट्रम असे एकापाठोपाठ काही लाख कोटींचे घोटाळे करावेत आणि त्यावर प्रमुख विरोधी पक्षाने फक्त ‘चिअर लीडर्स’ची भूमिका बजावावी, अशी पंतप्रधानांची अपेक्षा आहे का?,’ असा खडा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी उपस्थित केला.

‘जनतेने आमच्यावर ‘वॉचडॉग’ची जबाबदारी टाकली असून संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये भाजपने ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सदनाचे कामकाज बंद पडत असेल तर त्याची जबाबदारी सत्ताधार्‍यांचीच आहे,’ हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीचे उद्घाटन राजनाथसिंह यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास पत्रकारांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर राजनाथसिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.

‘अर्थव्यवस्था, देशांतर्गत आणि सीमेवरची सुरक्षितता आणि मुत्सद्दीपणा या तिन्ही पातळ्यांवर केंद्राची कामगिरी निराशजनक आहे. जागतिक मंदीमुळे अर्थव्यवस्था नाजूक बनल्याचा पंतप्रधानांचा दावा मान्यच नाही. सरकारची चुकीची धोरणे, नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळेच अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. पुढील बारा-चौदा महिन्यांच्या आयातीइतकेच परकीय चलन देशाकडे उपलब्ध आहे. केंद्र सरकार असाहाय्य आहे,’ अशी टीकाही राजनाथ यांनी केली.

सोने विकण्याची भाषा
‘सन 1991 मध्ये सोने गहाण टाकण्याची वेळ देशावर आली होती. आताचे मंत्री सोने विकण्याची भाषा करत आहेत,’ यावरही राजनाथ सिंह यांनी टीका केली.


नेतृत्व मुंडेंकडेच
सिरियातील संभाव्य युद्धप्रश्नी भारताने मूग गिळून गप्प न बसता भूमिका जाहीर केली पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करावा, ही भाजपची मागणी आहे.

चौदा वर्षे एकहाती सत्ता असूनही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात. या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला आणखी किती वेळ द्यायचा?

लोकसभा निवडणुका लवकर होण्यासाठी भाजपच्या सर्व खासदारांनी राजीनामे द्यावेत, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही लोकसभा व राज्यसभेत सरकारवरचा दबाव वाढवू.

महाराष्ट्रातील निवडणुका गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.