आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक-चीन कॉरिडॉर देशासाठी आव्हान, लष्करप्रमुख रावत यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चीन – पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने  देशाच्या  सार्वभौमत्वासाठी ते एक आव्हान आहे. मात्र आपण कोणतीही परिस्थिती हाताळण्यास समर्थ आहोत, असे प्रतिपादन भारतीय लष्करप्रमुख  जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे केले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर याप्रसंगी उपस्थित होते.

लष्काराचे दक्षिण मुख्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग यांच्यातर्फे  जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत  ‘सध्याची भूसामरिक बांधणी आणि भारतापुढील आव्हाने’ या विषयावर रावत बोलत होते. विभागप्रमुख डॉ. विजय खरे, जनरल जोशी यांच्या  पत्नी मंजूषा जोशी, सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हारिस यांच्यासह अनेक अधिकारी या वेळी उपस्थित होते.‘राजकीय, आर्थिक, लष्करी क्षेत्रांत चीन जागतिक पातळीवर आपला दरारा वाढवण्याच्या  प्रयत्नात आहे. चीनच्या  सत्ताधाऱ्यांनी  चीनचे लष्करी सामर्थ्य, क्षमता व पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. तसेच स्पेस आणि नेटवर्क या आधुनिक  युद्धपद्धतीतही ते ताकद वाढवत आहेत. आपणही विविध पातळ्यांवर आपली सज्जता वाढवत आहोत. चीनच्या वाढत्या शस्त्रसज्जतेकडे लक्ष ठेवून आहोत,’ असे जनरल रावत यांनी सांगितले. ‘जम्मू-काश्मीरमध्ये  दहशतवाद आणि घूसखोरीच्या माध्यमातून पाकचे छुपे युद्ध सुरूच आहे. तेथील मूलतत्त्ववाद्यांचे  वाढते प्रस्थ आपल्यासाठी चिंताजनक आहे.
 
सीमाभागांत पाककडून सतत शस्त्रसंधीचा भंग होत आहे. आपण त्याला योग्य ते प्रत्युत्तर देत आहोत. त्यामानाने ईशान्येकडून परिस्थिती सामान्य असल्याचे मत रावत यांनी मांडले.
संरक्षण दलांचे एकत्रित प्रयत्न आणि पूरक यंत्रणांचे सहकार्य  यामुळेच  कारवाईची क्षमता व परिणामकारकता वाढते. तिन्ही दलांच्या क्षमता, वैशिष्ट्ये निरनिराळी आहेत. त्यांना गुप्तचर विभाग, दळणवळण यंत्रणा, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रयंत्रसामग्रीची जोड आवश्यक ठरते, असेही रावत म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...