आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त कोवळी मने, आधाराने सावरली अन् उजळलीही..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वीस वर्षांपूर्वीची पहाट आठवली तरी आजही भीती वाटते... काही क्षणांत होत्याचे नव्हते करणारा तो धरणीकंप थरकाप उडवतो.. गाढ झोपेत असणारे आम्ही जागे झालो तेव्हा पायाखालची जमीन झोपाळ्यावर बसल्यासारखी डुलत होती.. पुढच्या काही क्षणांत घरातले भिंतीलगतचे कप्पे, कपाटे आणि इतर वस्तू पडू लागल्या.. भिंती कोसळू लागल्या..छपरे खाली आली... त्या प्रकोपाला वीस वर्षे उलटली, पण मनाच्या एका कोपर्‍यात आजही ती उद्ध्वस्त चित्रे ताजीच आहेत..

आज वयाच्या तिशी-पस्तिशीतली तरुणाई त्या भयानक दिवसाच्या आठवणी सांगत होती.. 30 सप्टेंबर 1993 या दिवसाची पहाट मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद परिसरात हजारोंच्या आयुष्यात काळरात्र होऊन उगवली. काही क्षणात सुमारे दहा-बारा हजार नागरिक मृत्युमुखी पडले. जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. त्यातही वेगळेपण जपत भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा यांनी भूकंपग्रस्त भागातील अनाथ, निराधार कोवळ्या जिवांचे भवितव्य घडवणार्‍या शैक्षणिक प्रकल्पाचा संकल्प सोडला. पुण्याजवळ नगर रस्त्यावरील वाघोली येथे दहा एकर जमीन घेऊन त्यांनी अनाथ, निराधार मुलांसाठी शैक्षणिक पुनर्वसनाचा प्रकल्प उभारला. भूकंपग्रस्त भागातील मुलांचे त्वरित सर्वेक्षण करून मुथा यांनी तातडीची गरज असलेल्या 1200 मुलांना वाघोली येथील प्रकल्पात सामावून घेतले. सर्व मुलांना वसतिगृह, शाळा, खेळ या सुविधा उपलब्ध करून दिल्या. पुढील दहा ते बारा वर्षांत ही सर्व मुले उत्तम शिक्षण घेऊन आपापल्या पायांवर समर्थपणे उभी राहिल्याचे सार्थकही त्यांनी अनुभवले.

उघड्या डोळ्यांनी विनाश पाहावा लागल्याने या भूकंपात आठ ते बारा या वयोगटातील शेकडो मुले मानसिकदृष्ट्याही खचली. पण आज उत्तम शिक्षण घेऊन ही सर्व मुले आज त्यांच्या पायावर समर्थपणे उभी आहेत. आमच्या प्रकल्पाचा उद्देश त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केला आहे, याचे समाधान वाटते अशी प्रतिक्रिया मुथा यांनी दिली आहे.

उत्तम शिक्षण मिळाले
दहाव्या वर्षी येथे आलो. शिक्षण, निवास, कपडे, शैक्षणिक सुविधा, चांगले मित्र मिळाले. आज मी हिंगोली येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहे.
-उद्धव कदम, कानेगाव, जि. उस्मानाबाद

स्मृती आजही अस्वस्थ करतात
मुंबई आयआयटीमध्ये मी वरिष्ठ मल्टिमीडिया वेब डिझाइनर म्हणून कार्यरत आहे. भूकंपाच्या धक्क्यातून आता सावरलो असलो तरी काही क्षणांत गमावलेल्या कुटुंबीयांच्या स्मृती आजही अस्वस्थ करतात.
- भैरवनाथ लोहटकर (राजेगाव, जि. उस्मानाबाद)

उत्तराखंडातही मदत
गेल्या पंधरा वर्षांत देशात जिथे आपत्ती कोसळल्या, त्या सर्व ठिकाणी ही मुले स्वत:हून आपदग्रस्तांच्या मदतीला धावून गेली. नुकतीच काही मुले उत्तराखंड येथेही मदतीसाठी गेली होती. त्यांच्यामध्ये जागलेली ही संवेदनशीलता फार महत्त्वाची आहे.
- शांतीलाल मुथा, भारतीय जैन संघटना